खासदार साहेब जरा मतदारसंघातही फिरा!

Madhuvan

दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे क्वचितच उगवले : शिरूर लोकसभा संघातील मतदार प्रचंड नाराज

रोहन मुजूमदार
पुणे – आता दर गुरुवार-शुक्रवार मी मतदारसंघासाठी वेळ देणार आहे, असे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर केले होते; मात्र त्यांच्या दिनदर्शिकेत गुरुवार-शुक्रवार नाही का? कारण त्या दिवसापासून खासदार अगदी बोटावर मोजण्या इतपतच मतदारसंघात अवतरले असल्याचे मतदार खुलेआम बोलत आहेत. त्यात महामारीच्या काळातही ते अगदी क्वचितच मतदारसंघात फिरले असल्याने ते मतदारसंघात कमी व मुंबईत अधिक असल्याने विरोधकांनाही टीका करण्याचे आयते फावले आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर शिरूरचे खासदार मतदारसंघात नसतात, असा आरोप विरोधक करत होते व आताही करीत आहेत. त्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी उत्तर देताना म्हणाले होते की, सुरुवातीला मी शिवस्वराज्य यात्रेत व्यस्त होतो. शरद पवारांनी माझ्यावर राज्याची जबाबदारी दिली होती आणि मी या मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदार निवडून दिले आहेत. तर आता दर गुरुवार-शुक्रवार मी वेळ देणार आहे. हडपसरनंतर नारायणगावात संपर्क कार्यालय सुरू केले आहे. गरज पडल्यास भोसरीतही कार्यालय सुरू आहे. इथले प्रश्‍न संसदेत मांडले जात असतील आणि कामे अडत नसतील, तर विरोधकांचा आरोप अनाठायी आहे, असेही डॉ. कोल्हे 2019मध्ये म्हणाले होते.

 

खासदार डॉ. कोल्हे अभिनयाप्रमाणे संसदेत मुद्देही चांगले उपस्थित करतात आणि परखडप्रमाणे मांडतातही, त्याची केंद्र दखलही घेतात हे त्यांचे काम उल्लेखनीयच म्हणावे लागेल. पण थेट मतदारांमध्ये मिसळणे म्हणा किंवा त्यांना धीर देण्यात ते अपयशी ठरत आहेत. त्यातच ते ज्या क्वचितवेळी (निसर्ग चक्रीवादळ दौरा सोडले तर) मतदारसंघात आले आहेत. अनेकदा ते फक्‍त जुन्नर तालुक्‍यातच दिसले आहेत. खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली या परिसरात त्यांचे दर्शन झाले नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

 

सध्या परतीच्या मुसळधार पावसाचा प्रकोप आंबेगाव तालुक्‍यात झाला आहे. तर विरोधक थेट बांधावर जात शेतकऱ्यांना दिलासा देताना दिसत आहे. सध्या, दिल्लीत संसद सुरू असल्याने डॉ. कोल्हे मतदारसंघातील प्रश्‍न व करोनावार केंद्राचे कान टोचत असून करोनामुळे सध्या ये-जा करणेही धोक्‍याचे आहे. मात्र, खासदारांचा एक प्रतिनिधी म्हणून कोणीतरी येणे अपेक्षीत होते. कामगार व उत्पादन शुक्‍ल मंत्री तथा आंबगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या समर्थकांनी वळसे पाटलांच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा दिला. ते जरी राष्ट्रवादीचेच असले तरी खासदारांच्या वतीने धीर देणारी व्यक्‍ती जर आली असती तर शेतकऱ्यांना आणखीन दिलासा मिळाला असता, असे मतदारांचे म्हणणे आहे.

 

  • व्यंगचित्र काढण्याची वेळ का आली?
    मुंबईमध्येच चित्रीकरणात व्यस्त असल्याचे व्यंगचित्र काढून शिवसेनेने ते व्हायरल केले होते. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रसकडूनही उत्तरही सडेतोड उत्तर देण्यात आले; मात्र ते काढण्याची वेळ विरोधकांना का आली? की खरंच तशी परिस्थिती आहे, असा सवाल आता मतदारसंघातून उपस्थित होत आहे.

 

  • कार्यकर्त्यांशी ‘नाळ’ जोडली की नाही?
    डॉ. अमोल कोल्हे यांना खासदार होऊन जवळपास दीड वर्ष झाले. त्यांनी त्याआधी शिवसेनेत संपर्कप्रमुख म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी ‘नाळ’ जोडण्याचा त्यांना अनुभव आहे; मात्र खासदार झाल्यापासून त्यांची कार्यकर्त्यांची ‘नाळ’ जुळलेली दिसत नाही. कारण, मतदारसंघातील प्रश्‍न अनेक आहेत. मात्र, ते पूर्णपणे खासदारांपर्यंत पोहोचत नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे की नाही असा सवाल मतदारांनी उपस्थित केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.