सातारा – भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातील क्रीडा संकुलावरून संतप्त झाल्याचे पहायला मिळाले आहे. क्रीडा संकुल उभारले तेव्हाच्या पालकमंत्र्यांना मुस्काडले पाहिजे असे आक्रमक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. या क्रिडासंकूलाची कामे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असताना करण्यात आली होती. त्यामुळे उदयनराजेंचा रोख हा अजित पवार यांच्याकडे जात असल्याचे बोलले जात आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचे वाटोळं केले आहे. जोड्याने मारलं पाहिजे त्यावेळेस कोण पालकमंत्री आणि जे जे आमदार होते मला त्यावेळी विरोध केला ना… आणि असे दाखवले की मी विरोध करतोय कारण नसताना… कोणी केलं आहे हे सर्वांना माहिती आहे. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
संकुल चुकीच्या पद्धतीने उभे करण्यात आले आहे. आधी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. आता साधी रणजी ट्रॉफीची मॅच देखील जिंकू शकत नाही, अॅथेलेटिक्स जिंकत नाही, नेमकं काय चाललंय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे. स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये. जे स्टेडियमचं वाट्टोळं करत आहेत, त्यांना मुस्काडलं पाहिजे असे आक्रमक विधान यावेळी उदयनराजे यांनी केले आहे.