सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची ही तलवार प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. याबाबत आता स्वतः छत्रपती घराण्याचे वंशज आणि खासदार उदयनराजे राजे भोसले यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे असं उदयनराजे म्हणाले. तसेच टॉवर ऑफ लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही तलवार ठेवण्यात आली आहे. प्रत्येकाला वाटत की ती तलवार इथं आणावी. टॉवर ऑफ लंडनची सिक्युरिटी मी पाहिली आहे आणि मला असं वाटत की,ब्रिटिश सरकारने मोठं मन दाखवून त्या त्या देशाला त्यांच्या वस्तू परत दिल्या पाहिजेत. असं स्पष्ट मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. साताऱ्यातुन ते माध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असून तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली होती. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची नोंद इतिहासात आहे.त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.