भोपाळ – मध्य प्रदेशातील गरीब पुजाऱ्यांना महिना पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय त्या राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केला आहे. काल अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. भगवान परशुराम यांच्या विषयीची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची घोषणाहीं त्यांनी केली.
ते म्हणाले की, ज्या मंदिरांच्या मालकीच्या जमिनी आहेत त्या जमिनींची विक्री थांबवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार असून त्यांच्या मार्फत हा विषय सोडवला जाईल. संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, राज्यातील सर्व मंदिरांची व्यवस्था पुजाऱ्यांच्याच हातात असली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असून मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप यापुढील काळात केला जाणार नाही.