नगरसेवक बेलदरे; नवले ब्रीज ते कात्रज रस्ता कामाबाबत घेतात माहिती
आंबेगाव बुद्रुक – कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नवले ब्रीज ते कात्रज दरम्यानच्या रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केल्यानंतर हा प्रश्न आगामी सहा महिन्यांतच निकालात निघेल, अशी ग्वाही केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यानंतर याबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला त्यासंदर्भातील अपडेट खासदार सुळे सातत्याने घेत असल्याचे नगरसेवक युवराज बेलदरे यांनी सांगितले.
कात्रज-बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ सातत्याने होत असलेली कोंडी, सातारकडील बाजूने दरी पुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांना होणारे जीवघेणे अपघात, कात्रज बाजूकडे प्रलंबित राहिलेली रुंदीकरणाची कामे यामुळे दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहतुकीचे प्रश्न वाढत आहेत. याशिवाय सतत होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरसेवक युवराज बेलदरे तसेच पथविभागातील अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी केली होती.
या पार्श्वभुमीवर खासदार सुळे या सातत्याने राष्ट्रीय रस्ते महामंडळ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहेत. लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यानच त्यांनी सदर मुद्दा उपस्थित करीत याकडे लक्ष वेधले होते.
यावर नितीन गडकरी यांनी उत्तर देताना या भागातील एक भुयारी मार्ग पुढील काही दिवसांतच पूर्ण होणार असून आणखी एका पुलाचे काम लवकरच सुरू होईल. तसेच, रस्ता रुंदीकरण आणि इतर कामे सुद्धा आगामी सहा महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. त्यानंतर याबाबतची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून स्थानिक अपडेट खासदार सुळे सातत्याने घेत असल्याचे नगरसेवक बेलदरे यांनी सांगितले.
महामार्गाला समांतर डीपी रस्ते जोडण्याची मागणी आहे, तसेच समांतर भुयारी मार्गामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. राजामाता भुयारी मार्गाची उंची वाढविण्याबाबतही खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे.
– युवराज बेलदरे, नगरसेवक