मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील खोचक टोला लगावला आहे.
सरकारवर केली टीका
‘महायुतीचा लोकसभेत दारूण पराभव झाला, काही जागा कमी फरकानं पडल्या. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचं सरकार आल्यावर या योजनेचे पैसे वाढवू. या आधी फुटलेले लाडके आमदार, लाडके खासदार यांच्यापलीकडे यांना काही दिसत नव्हते.निवडणुका वेळेत घ्याव्याच लागतील.
नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जातोय. पण ते विकले गेले नाहीत. ते मोदी-शहांच्या तुरूंगाच्या भिंती फोडून आलेत. मोदी, शहा, फडणवीस यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलं तेव्हढं नुकसान गेल्या 100 वर्षांत कुणी केलं नाही.’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
अजित पवारांना लगावला टोला
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता असे अजित पवारांनी मान्य केले होते. यावरून संजय राऊतांनी त्यांना टोला लगावला आहे. अजित पवारांना उपरती का झाली? माहिती नाही. काकांचा सल्ला जोपर्यंत घेत होते तोपर्यंत त्यांचं बरं सुरू होतं. अजितदादा राखी बांधायला सुप्रिया सुळेंकडे जातील तेंव्हा त्या काय करतील याकडे महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र लढला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.