पुणे : शिवसेनेला आगामी काळात एकहाती सत्ता हवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आवाहनही केले आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीपासून तयारी हवी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या विनंतीवरून पुणे जिल्ह्याचा दौरा खासदार राऊत यांनी केला. उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही याबाबत आग्रह धरला होता. आपल्या दौऱ्याच्या व्यस्त दिनक्रमातूनही या विनंतीला मान देत खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना राऊत यांनी सदर सूचना केली.
खासदार राऊत यांनी सर्वप्रथम दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनतर
माजी खासदार आढळराव पाटील यांच्या निर्देशानुसार ज्ञानेश्वर कटके यांनी जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यातील समस्यानुसार दौऱ्याचे नियोजन केले होते.
तालुका पातळीवरील पी एम आर डी ए विभागांतर्गत येणारी कामे, तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची कामे, भामाआसखेडचे पाणी पुणे शहराला देण्याबाबतचा प्रश्न यातून स्थनिक शेतकऱ्यांवर होणार अन्याय, खेड घाट रस्त्याचे काही ठिकाणी रेंगाळलेले काम, पुणे-नगर मार्गावरील वाहतूक समस्या, रिंगरोड, रस्ता रुंदीकरण त्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासह प्रत्येक तालुक्यातील समस्यांचा लेखाजोखा जिल्हा प्रमुख कटके यांनी खासदार राऊत यांच्यापुढे मांडला.
या पार्श्वभूमीवर बोलताना सेनेला आता एकहाती सत्ता हवी आहे, याकरिता पुणे जिल्ह्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून तयारी हवी, यासाठी आतापासूनच कामाला लागा, तयारी करा, अशी सूचना संजय राऊत यांनी यावेळी केली.
व्यस्त दिनक्रम असतानाही खासदार राऊत यांच्या गाड्यांचा ताफा गावोगाव धावत होता, स्थनिक प्रश्न जाणून घेण्यासाठी राऊत हे गाडीतच ज्ञानेश्वर कटके यांच्याशी त्या-त्या ठिकाणबाबत चर्चा करत होते. काही ठिकाणी थांबून त्यांनी शेतकरी, ग्रामस्थाशी संवादही साधला.
व्वा माऊली….
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असताना जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी घेत ज्ञानेश्वर आबा कटके यांनी त्या-त्या तालुक्यातील पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवत वेळ प्रसंगी प्रत्यक्ष भेट देत कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याकरीता आरोग्य यंत्रणा योग्यरित्या हाताळली. तालुका पातळींवर कोरोना पूर्ण नियंत्रणात ठेवताना रुग्णालय, तपासणी सेंटर, रुग्णासह नातेवाईक यांची घेतलेली काळजी याची माहिती उपनेते आढळराव पाटील यांनी खासदार राऊत यांना दिल्यानंतर “व्वा माऊली” म्हणत त्यांनी ज्ञानेश्वर कटके यांचे कौतूक केले.
यावेळी तालुक्यांची माहिती घेत असताना खासदार राऊत यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्याशी शिवसेना पक्षाच्या संघटनात्मकतेबाबत ही चर्चा केली. येथील विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, काही अडचणी असतील तर थेट माझ्याकडे या, असे सांगून राऊत यांनी जिल्हा प्रमुखांसह सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सूचना केल्या.
आपल्या लगबगीच्या दिनक्रमातही वेळे दिल्याबद्दल जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी खासदार राऊत यांचे आभार मानले. राऊत यांनीही सेनेच्या कार्यकर्त्यांचा निरोप घेत माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासोबत पुढील कार्यक्रम स्थळाकडे आगेकूच केली.