महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीला सामोर जाव लागतय हे चिंताजनक – संभाजीराजे

कोल्हापूर – महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेचा पेच काही सुटता सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता मंगळवारपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यावर ओढवलेल्या या राजकीय अस्थिरतेवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ट्विट केले आहे.

दरम्यान, संभाजीराजे ट्विटमध्ये म्हणत आहेत की “महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जातोय, अनेक कारणांमुळे युवक नैराश्यात आहेत, अनेक प्रश्न राज्यसमोर आ वासून उभे असताना, ही राजकीय अस्थिरता परवडणारी नाही. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढावा व स्थिर सरकार स्थापन करुन लोकाभिमुख राज्यकारभार करावा,” अस संभाजीराजेंनी ट्विट करून म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र, शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्याआधी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली यामध्ये सर्वच मंत्र्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर सहमती दर्शवली होती. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.