खासदार कार्ति चिदंबरम यांना करोना संसर्ग

नवी दिल्ली : करोनाचा संसर्ग आता सर्वसामान्य जनतेपासून ते बड्या लोकांपर्यंत पोहचला आहे. भाजपच्या पाच बड्या नेत्यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता तामिळनाडूतील खासदार कार्ति चिदंबरम यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी ट्विटद्वारे आपल्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.

माझी करोना टेस्ट नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात सौम्य लक्षण आहेत आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी होम क्वारंटाइन झालो आहे. अशातच माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी देखील स्वतःची तपासणी करून घ्यावी व वैद्यकीय सुचनांचे पालन करावे. असे कार्ति चिदंबरम यांनी ट्विट केले आहे.

कार्ति चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य देखील आहेत. या अगोदर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहीत हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांना राजभवनातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष देत आहे. कालच उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यापाठोपाठ देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यानंतर त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.