ग्वाल्हेर, दि. 7 – रेमडेसिविर हे करोना रुग्णांसाठीचे औषध घेऊन येणारे मध्यप्रदेश सरकारचे विमान ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असतानाच कोसळण्याचा प्रकार काल गुरुवारी घडला. तथापि या विमानाचे वैमानिक आणि सहवैमानिक सुदैवाने बचावले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या विमानातील औषधांचा साठाही सुरक्षित राहिला असल्याने मोठी आफत टळली आहे. ग्वाल्हेरच्या महाराजपुरा विमानतळावर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. हे विमान लॅंडिंग होत असतानाच कोसळले आणि ते रनवेवरून काहींसे घसरले.
राज्याच्या विविध भागात या औषधांचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने आपल्या सेवेतील विमानाची मदत घेतली आहे. पण आता या प्रकारामुळे विमानात मोठा बिघाड झाल्याने यापुढील काहीं काळ तरी हे विमान या सेवेत वापरता येण्याची शक्यता नाही.