नवी दिल्ली – प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराने आव्हान दिले आहे. पंतप्रधानपदाची दावेदारी निश्चित होताच, वाराणसीमधून निवडणूक लढविणाऱ्या नरेंद्र मोदी यांना काँग्रेस खासदाराने चॅलेंज केले आहे. आपल्याला केवळ पक्षाचा आदेश हवा, मी इतिहास घडवून दाखवेन, असं ते म्हणाले.
वारणसी मतदार संघातून मोदी सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. मात्र २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यास आपण वाराणसीतून मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवू असं चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असून त्यांना सत्ता सोडावी लागली आहे.
पुढील लोकसभा निवडणूक लढविण्यास आपल्याकडे तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. वाराणसीला जाऊन निवडणूक लढवा, असा आदेश पक्षाने आपल्याला द्यावा. तिथं जाऊन निवडणू लढलो अन् मोदींना पराभूत केल नाही, तर मी बाळू धानोरकर नाही असंही धानोरकर म्हणाले. मी पक्षश्रेष्ठींकडे यासंदर्भात महिती दिली आहे. मोदींनी एकाच मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी आपली एकमेव अट आहे. जेणे करून एकतर मोदी राजकारणात राहतील किंवा मी राहिल, असंही धानोरकर यांनी सांगितले.
माझी आतापर्यंतची कारकीर्द पाहिल्यास मी इतिहास घडवलेला माणूस आहे. इतिहास घडवायचा हाच माझा उद्देश आहे. राजकरणात येण्यासाठी किंवा पद, मंत्रिपदं घेण्यासाठी माझा जन्म झालेला नाही, असेही ते पुढे म्हणाले.
२०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले तेव्हा पूर्व विदर्भातून धानोरकर एकमेव आमदार होते. पुढे २०१९ शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये सामील जालेल्या धानोरकर यांनी १५ दिवसांच्या तयारीत विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या भाजपच्या हंसराज अहिर यांना पराभूत केले होते.