नवी दिल्ली – दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जम्मू-काश्मीरचे बारामुल्लाचे खासदार शेख रशीद उर्फ इंजिनियर रशीद यांना दहशतवादी फंडिंग प्रकरणात 2 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रशीदला एनआयएने 2017 मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी फंडिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर 2019 पासून रशीद दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. आगामी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रशीदने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. रशीद यांचे भाऊ खुर्शीद अहमद शेख लंगेट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
काश्मीरमधील दहशतवादी गट आणि फुटीरतावाद्यांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयएने अटक केलेल्या काश्मिरी व्यापारी जहूर वाटालीच्या चौकशीदरम्यान त्याचे नाव पुढे आले होते. एनआयएने या प्रकरणी काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक, लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्यासह अनेकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यासीन मलिकला ट्रायल कोर्टाने 2022 मध्ये या आरोपांवर दोषी ठरवल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंजिनियर रशीद याने बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला. 2008 आणि 2014 च्या जम्मू-काश्मीर निवडणुकीत ते लंगेट विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. रशीद हे अवामी इत्तेहाद पक्षाचे (एआयपी) नेतृत्व करतात पण त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती.