सोरतापवाडी, (वार्ताहर) – नुकतीच लोकसभेची निवडणूक होऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदारपदी विराजमान झाले. पूर्व हवेलीतील जुन्या समस्यांची आव्हाने खासदार अमोल कोल्हे यांच्यापुढे असून त्या समस्या डॉ. कोल्हे कितपत सोडवतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ हवेली तालुक्यातील हडपसरपासून सुरू होऊन तो उरुळी कांचनपर्यंत येतो. या मतदारसंघातील रस्ते, कचरा व वाहतूक या समस्या जुन्याच असून त्या खासदार कोल्हे यांना आव्हान देणार्या आहेत. हडपसरपासून सुरू होणार्या मतदारसंघामध्ये दररोज प्रंचड वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गाडीतळ चौक, पंधरा नंबर चौक, मांजरी बाजारा समोरील वाहतूक कोंडी, थेऊर फाटा, नायगाव फाटा येथील वाहतूक कोंडी, उरुळी कांचन येथील दोन्ही चौकातील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. हडपसर व उरुळी कांचन येथे तर दररोज वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांना पूर्व हवेलीतील या गंभीर समस्येकडे जास्त लक्ष देऊन उड्डाणपूल व बायपास रस्त्यांची सोय करून लवकरात लवकर उपाय योजना करावी लागणार आहेत.
सोरतापवाडी व परिसरातील गावात वादळी पावसाने पाँली हाऊस व नर्सरी उद्योगाचे नुकतेच प्रचंड नुकसान झाले आहे.शासनाच्या जीआरमध्ये नुकसानभरपाईची तरतूद नसल्याने तशी तरतूद करण्यात यावी अशी मागणी शासनस्तरावर करावी लागणार असून भविष्यात असे परत झाले तर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
केंद्र शासनाने बाजार समितीमध्ये लक्ष दिले तर शहरी भागात भरणारा बाजार हा शेतीपट्ट्यात उभा करण्यासाठी उरुळी कांचन, कोरेगाव मूळ येथे बाजार उभा करण्यास मदत करून शेतकर्यांना एक अत्याधुनिक बाजार उभा करण्यास डॉ.कोल्हे यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. खडकवासला धरणातील पाणी पुणे महानगरपालिका उचलून ते शुद्ध करून पुणे शहराला पिण्यासाठी देत आहे.
पुढे तेच सांडपाणी मुळा-मुठा नदीत सोडून शेतकर्यांना मिळत असून त्या पाण्यावर शेतकर्यांसाठी मीटर पद्धत अवलंबली जात असून ही मीटर पद्धत अन्यायकारक असून ती हटविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. फुले व इतर शेतमाल निर्यात्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करावा लागणार आहे.
तसेच कृषीपंपांसाठी दिवसा वीज मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून तो प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. तसेच पूर्व हवेलीतील विजेच्या खांबावरील तारा 1980 मध्ये टाकलेल्या असून काही ठिकाणी वीजवाहिन्या कमजोर झालेल्या आहेत, त्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन वीज वाहिन्या बसविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
यावर आवाज उठवावा लागणार
हवेली तालुक्यातील अनेक गावात केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेचे काम सुरू असून ती योजना पूर्ण करण्यासाठी व त्याचा दर्जा राखण्यासाठी पुढाकार घेऊन त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
हवेली तालुक्याची अस्मिता असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी अमोल कोल्हे यांना केंद्रातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहेत. शेतकर्यांच्या उत्पन्नावाढीसाठी अजून दोन-तीन पिके आधारभूत किमतीमध्ये समावेश करण्यासाठी संसदेत शेतकर्यांच्या बाजूने आवाज उठवावा लागणार आहे.
कचरा समस्या गंभीर
पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे कचर्याची समस्या ही पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात असून एका मोठ्या कचरा प्रकल्पाची या भागात गरज असून तसा प्रकल्प केंद्र सरकारकडून आणावा लागणार आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन येथील रेल्वे खालील भुयारी मार्गासाठी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
कारण की लोणी काळभोर येथील राजेंद्र पंपाच्या मागील भुयारी मार्ग एक, दोन शेतकर्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील नागरिकांना चार किलोमीटरवरून वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे तो प्रश्न सोडवून नागरिकांचा वेळ, त्रास व वळसा वाचवाण्याचे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांच्या पुढे आहे .
महाविकास आघाडीचे खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे हे नक्कीच आगामी काळात पूर्व हवेलीतील सर्व समस्यांचे निरकारण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील याची खात्री आहे. घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडे कामांचा पाठपुरावा करून हवेलीतील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. – स्वप्निल कुंजीर, शिरूर-हवेली विधानसभा संघटक, शिवसेना ठाकरे गट