ओझर : जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला जीआय मानांकन मिळावे यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला जीआय मानांकन बहाल केले.
जुन्नर तालुक्यात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा हापूस आंबा वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे जुन्नरच्या हापूस आंब्याला ‘शिवनेरी हापूस’ म्हणून जीआय मानांकन मिळावे यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र प्रयत्नशील होते.
शिवनेरी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावा यासाठी खासदार डॉ. कोल्हे सन २०२२ पासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. या प्रयत्नांना यश मिळाले असून जशी काश्मिरी केशर, बनारसी साडी किंवा दार्जिलिंग चहा या धर्तीवर जुन्नर तालुक्यातील आंब्याला ‘शिवनेरी हापूस आंबा’ अशी ओळख मिळाली आहे.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नरच्या ‘शिवनेरी हापूस आंब्याला’ जीआय मानांकन मिळावे यासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार वेळोवेळी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे या भागाचा लोकप्रतिनिधी खासदार म्हणून केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत होतो.
त्यामुळे शिवनेरी हापूसला जीआय मानांकन मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला याचा विशेष आनंद आहे. त्याचबरोबर पालकमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार अतुल बेनके यांचेही याकामी सहकार्य मिळाले, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. कोल्हे यांनी दिली.
जी आय मानांकन म्हणजे काय?
एखादे उत्पादन ठराविक भौगोलिक परिस्थितीत विशिष्ट भागात घेतले जात असेल आणि त्याला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जी आय मानांकन दिले जाते. हे मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना त्याचा फायदा होतो.
जी आय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. कारण वेगवेगळ्या विशिष्ट भौगौलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता वेगवेगळी असू शकते. ही ओळख कायम ठेवणे जीआय मानांकनामुळे शक्य होते.