याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी
मुंबई : जात पडताळणी समितीने जातप्रमाणपत्र रद्द केल्याने खासदारकी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिलींद मुळे यांनीही उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करून खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या याचिकेवर आमची बाजू ऐकूण घेतल्याशिवाय न्यायलयाने एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली आहे.
भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नूरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरे मठ यांनी लोकसभा निवडणूक 2019 साली बनावट जात प्रमाणपत्र सादर केले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे, असा आरोप करत अपक्ष उमेदवार व माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली.
न्यायालयाने याची दखल घेऊन जातपडताळणी कमिटीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान जातपडताळणी कमिटीने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखलाच अवैध ठरवून रद्द केला. त्यामुळे खासदारकी अडचणीत आल्याने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातपडताळणी कमिटीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजा ठोठावत याचिका दाखल केली आहे.