लखनौ – समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या चिरंजीवांनी ते वयाच्या पात्रतेत बसत नसतानाही विधानसभेची निवडणूक लढवली आणि ती जिंकली. पण आता त्यांना ते चांगलेच अंगलट आले असून या प्रकरणी आझम खान, त्यांच्या पत्नी आमदार तंझीम फातीमा आणि त्यांचे चिरंजीव आमदार अब्दुल्ला आझम या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 2 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे अशी माहिती रामपुरचे पोलिस अधिक्षक संतोषकुमार मिश्रा यांनी दिली.
अब्दल्ला यांनी जन्मतारखेचे खोटे प्रमाण पत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हे खोटे प्रमाण पत्र त्यांच्या आई वडिलांनीच सादर केल्याचे कारण दाखवून पोलिसांनी त्यांचे पुत्र अब्दुल्ला यांच्यासह आझम खान आणि त्यांच्या पत्नीलाही अटक केली आहे.