नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चोरीचा आरोप करण्यात आला आहे. ही चोरी एखाद्या वस्तूची नसून चक्क म्हैस चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आसिफ अली आणि जाकिर अली या दोघांनी रामपुर पोलीस स्थानकामध्ये खान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये खान यांच्याबरोबरच माजी कार्यकारी अधिकारी आले हसन यांच्यासहीत इतर सहा जणांच्या नावाचा समावेश आहे. सर्व आरोपींनी आमच्या घरात घुसून तोडफोड केली, शिविगाळ केला आणि आमची म्हैस चोरुन नेल्याचे आसिफ आणि जाकिर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नवाब राजा अली खां यांनी सराय गेट येथे गरीबांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. याच ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून अली कुटुंब राहत होते. 15 ऑगस्ट 2016 रोजी पहाटे सव्वापाच वाजता कार्यकारी अधिकारी आले हसन, ठेकेदार इस्लाम, शिपाई धर्मेंद्र, फसाहत शानू, वीरेंद्र गोयल यांच्यासहीत इतर 20 ते 25 लोकांनी घरामध्ये बळजबरीने प्रवेश केला आणि घर खाली करण्याची धमकी देत घरातील वस्तूंची तोडफोड करु लागले. या ठिकाणी आझम खान यांना शाळा बांधायची असल्याने ते बळजबरीने घर खाली करण्यासाठी तेथे राहणाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.