खासदार आणि केंद्रीय मंत्री रिंगणात असल्याने यावेळी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत रंजक लढत होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल होताच सर्व उमेदवारांच्या संपत्तीचा तपशीलही समोर आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत.
कैलाश विजयवर्गीय यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, विजयवर्गीय आणि त्यांची पत्नी आशा विजयवर्गीय यांच्याकडे एकूण 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर शिवराज सिंह चौहान आणि त्यांची पत्नी साधना सिंह यांच्याकडे एकूण 8.62 कोटी रुपयांची संपत्ती आहे. कैलाश विजयवर्गीय 10 वर्षांनंतर मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. विजयवर्गीय यांच्या संपत्तीत 10 वर्षात 7 पटीने वाढ झाली आहे. 2013 मध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 1.81 कोटी रुपयांची संपत्ती होती.
शिवराज आणि कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे किती मालमत्ता ?
शिवराज सिंह चौहान यांच्याकडे 9.43 कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता आहे. यामध्ये 3.01 कोटी रुपयांची चल मालमत्ता असून 6.42 कोटी रुपयांची स्थावर अचल मालमत्ता आहे. जर आपण कैलाश विजयवर्गीय यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल बोललो तर त्यांच्याकडे 13 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर एकूण संपत्ती 14 कोटी 57 लाख रुपयांची आहे.
यामध्ये आशा विजयवर्गीय यांच्या नावावर 10 कोटी रुपयांचा भूखंड आहे, जो त्यांनी 5 वर्षांपूर्वी 1 कोटी 35 लाख रुपयांना खरेदी केला होता. सध्या 6000 चौरस फूट दरानुसार त्याची किंमत 10 कोटी रुपये झाली आहे. याशिवाय विजयवर्गीय यांच्याकडे 1500 स्क्वेअर फूटचा आणखी 48 वर्षे जुना प्लॉट आहे, जो त्यांनी 5000 रुपयांना विकत घेतला आहे. आता त्याची किंमत सुमारे 2 कोटी 35 लाख रुपये झाली आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्याकडे विदिशा आणि जैत गावात 51,25,000 रुपयांच्या तीन मालमत्ता आहेत, तर साधना सिंह यांच्याकडे अरेरा कॉलनी, भोपाळमधील तीन निवासी ब्लॉक्समध्ये एक तृतीयांश हिस्सा आहे. या दोघांकडे एकूण ४.८९ कोटी रुपयांची शेतजमीन आहे. शिवराज यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ६.४२ कोटी रुपयांची घरे आणि शेतजमिनी अशी स्थावर मालमत्ता दाखवली आहे.
कैलाश विजयवर्गीय रोख रकमेच्या बाबतीतही ‘अधिक श्रीमंत’
रोख रकमेबद्दल बोलायचे झाले तर कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे एकूण 94 हजार 732 रुपये आणि आशा विजयवर्गीय यांच्याकडे 50 हजार 212 रुपये आहे. विजयवर्गीय यांच्याकडे बँकेत 22.67 लाख ठेवी आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे 10.63 लाख ठेवी आहेत.
त्याचबरोबर शिवराज सिंह आणि त्यांच्या पत्नीकडे जास्त संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रात शिवराज यांनी तीन बँकांमध्ये ९१,७९,१०४ रुपये, साधना सिंह यांच्या चार बँक खात्यांमध्ये ७१,८७,५४४ रुपये जमा असल्याचे सांगितले. शिवराज यांच्याकडे 1 लाख 10 हजार रुपये आणि पत्नीकडे 1 लाख 15 हजार रुपये रोख आहेत.
कोणाकडे किती दागिने आहेत
दागिन्यांबद्दल बोलायचे झाले तर शिवराज यांच्याकडे 96 ग्रॅम सोने आणि 6 लाख रुपये किमतीचे दागिने आणि साधना सिंह यांच्याकडे 535 ग्रॅम सोने आणि दागिने आहेत. त्यांची किंमत 34 लाख रुपये आहे. तर, कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे 13 लाख रुपयांचे दागिने आणि आशा विजयवर्गीय यांच्याकडे 39.15 लाख रुपयांचे दागिने आहेत.