पुणे – येथे झालेल्या २५ हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत जपानच्या मोयुका उचिजिमाने तर दुहेरीत कझाकस्तानच्या ऍना डॅनिलिना व युक्रेनच्या व्हॅलेरिया स्त्राकोव्हा या जोडीने स्पर्धेचे जेतेपद पटकविले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आज झालेल्या एकेरीच्या अंतिम लढतीत जपानच्या बिगरमानांकीत मोयुका उचिजिमा हिने चौथ्या मानांकित लॅटवियाच्या मार्सिंकेविकाचा 6-2, 7-5 असा पराभव केला. हा सामना 1तास 37मिनिटे चालला. दुहेरीत अंतिम फेरीत कझाकस्तानच्या ऍना डॅनिलिना हिने युक्रेनच्या व्हॅलेरिया स्त्राकोव्हाच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मत्सुदा या जोडीचा 6-0, 2-6 [10-5] असा पराभव केला.
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या मोयुका उचिजिमाला डॉलर3935 (295536 रुपये) व 65 गुण, तर उपविजेत्या डायना मार्सिंकेविकाला डॉलर2107 (158245रुपये) व 40 गुण अशी पारितोषिके देण्यात आली. दुहेरी गटातील विजेत्या जोडीला डॉलर1437 (1,07932रुपये) व 65 गुण, तर उपविजेत्या जोडीला डॉलर719 (54000रुपये) व 40 गुण अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनइसीसीचे महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर,एमएसएलटीएचे उपाध्यक्ष विश्वास लोहकरे, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव गिरीश इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव मिहीर केळकर, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.