चित्रपट – प्रेमित्रकोणाचा “फॉर्म्युला’

सोनम परब

हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकली तर प्रेमकथा आणि त्यातही त्रिकोणी प्रेमकथांकडे असणारा निर्माते-दिग्दर्शकांचा ओढा स्पष्टपणाने जाणवतो. याचे मुख्य कारण म्हणजे अशा चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद. त्यामुळेच वर्षानुवर्षांपासून वेगवेगळी वळणे घेत, नवे बदल करत हा प्रेमत्रिकोणाचा फॉर्म्युला बॉलीवूड जोपासत आलं आहे. दिलीपकुमारांपासून शाहरुखपर्यंत आणि तिथून पुढेही हा “सिलसिला’ चालत आला आहे आणि राहील. दुसरीकडे अनेक कलाकारांच्या वैयक्‍तिक आयुष्यातही हे “त्रिकोणी’ चित्र पाहायला मिळतं.

बहुतांश हिंदी चित्रपटांचा हिट फॉर्म्युला म्हणजे प्रेमत्रिकोण. हल्ली प्रेमत्रिकोणावर आधारित चित्रपट तयार होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे आणि त्याला प्रेक्षकांची दादही मिळते आहे. नुकताच आलेला “स्टुडंट ऑफ दी इअर’ चित्रपट असो किंवा “दे दे प्यार दे’ किंवा बिग बजेट “कलंक’ सिनेमा असो, ह्या सर्व चित्रपटांमध्ये धागा होता तो प्रेमत्रिकोणाचा. हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकाला नेहमीच प्रेमत्रिकोणाविषयी रुची राहिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटात प्रेमत्रिकोणाचे वेगळेच महत्त्व आहे. वर्षानुवर्षांच्या सिनेसृष्टीच्या प्रवासावर नजर टाकली तर प्रेमत्रिकोणावर आधारित चित्रपटांना भरपूर प्रसिद्धी मिळते आणि बॉक्‍सऑफिसवरही ते तगडी कमाईही करतात. जुन्या जमान्यातल्या “सिलसिला’ सारख्या प्रेमत्रिकोणावरील चित्रपटाला चांगली पसंती आणि प्रसिद्धी मिळाली होती. अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्यातील प्रेमत्रिकोण असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांचा इतिहास फार जुना आहे. अगदी राजापासून रस्त्यावरील गरीब व्यक्‍तीपर्यंत कोणाचीही प्रेमकथा वेगवेगळ्या रूपात हिंदी चित्रपटसृष्टीत पडद्यावर आल्या आहेत. अर्थात प्रत्येक प्रेक्षकाची आवड निराळी असते. काहींना “मुगले आझम’ मधील सलीम-अनारकलीची प्रेमकथा रूचली तर काहींना “देवदास’च्या देवदास-पारो-चंद्रमुखी यांचा प्रेमत्रिकोण आवडला. याखेरीज लैला-मजनू, हीर-रांझा, शिरीं-फरहाद यांच्यासारख्या दुःखद पण अमर प्रेमकथा आवडणाऱ्यांची एक वेगळी यादीच होईल.

प्रेमत्रिकोण असलेल्या कथांमुळे प्रेक्षक चित्रपटाशी जोडला जातो. या चित्रपटाच्या शेवटाची उत्सुकता असतेच पण चित्रपटभर सहानुभुतीचा एक भाव प्रेक्षकांना बांधून ठेवतो. या चित्रपटांतील काही क्षण आठवणीत राहतात. प्रेमाखातर आपल्या प्रतिस्पर्धी व्यक्‍तीलाचा स्वतःच्या आवडत्या व्यक्‍तीकडे जाऊ देऊन त्याग करण्यासारखे प्रकार यातील काही चित्रपटांत दाखवले जातात. पण प्रामुख्याने प्रेमात विश्‍वासघात, ईर्ष्या या भावना पात्रांच्या माध्यमातून दाखवल्या जातात. प्रेमत्रिकोणाची कथा असलेल्या चित्रपटांचे संवाद आणि गाणीही खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात.

हिंदी चित्रपटसृष्टीने अगदी सुरुवातीपासून प्रेमत्रिकोणाला आपलेसे केले आहे. अर्थात प्रत्येक प्रेमत्रिकोणाचा शेवट हा सुखद असतोच असेही नाही. गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांना न रडवता हसवणाऱ्या प्रेमत्रिकोणी कथाही चित्रपटसृष्टीने रुपेरी पडद्यावर आणल्या. पण जुन्या जमान्यातल्या अनेक प्रेमत्रिकोण चित्रपटातील पात्रांनी प्रेक्षकांची सहानुभुतीही मिळवली.

सुरुवातीच्या काळात पौराणिक आणि ऐतिहासिक कथाचा बोलबाला होतो. तेव्हा अनिष्ट सामाजिक चालीरीतींवर हल्लाबोल करणारे पण सौहार्दतेने संदेश देणारे चित्रपटही भरपूर होते. चित्रपटांमध्ये गाण्यामधून प्रेमाची कबुली देण्याचा तो काळ होता. नायक- नायिका दुरूनच डोळ्यांच्या इशाऱ्याने प्रेमाची कबुली देत असत; पण स्पष्ट होकार दर्शवत नसत. त्याच काळात दिलीपकुमार या नायकाने प्रेमाचे दुःखी रूप साकारले. देव आनंदने रोमॅंटिक प्रेमी साकारला, तर राजकपूरने सामान्य माणसाच्या भावनांशी प्रेमभाव जोडला.

महबूब खान यांच्या “अंदाज’ चित्रपटामध्ये दिलीपकुमार, राजकपूर आणि नर्गिस यांचा प्रेमत्रिकोण दाखवण्याचे नवे सूत्र यशस्वी झाले आणि त्यानंतर त्रिकोणी प्रेमकथांवर आधारित खूप चित्रपट आले. प्रेमत्रिकोण असलेल्या चित्रपटातील नायिका गोंधळलेली दाखवणे हा दिग्दर्शकाचा आवडता उद्योग. त्याच काळात दिलीपकुमार हा विरहाने दुःखी झालेला नायक दाखवला. या काळात प्रेमातील अपेक्षाभंगाचा उदासवाणा काळ चित्रपटांमध्ये दाखवला गेला. “मेला’, “अमर’, “बेवफा’, “संगदिल’, “नदिया के पार’, “जोगन’ इत्यादी चित्रपटांमध्ये दिलीपकुमार यांनी प्रेमातील अप्रामाणिकपणा आणि विशाद अशा तडफेने उभा केला की प्रेम ही भावना खरोखरीच उद्‌ध्वस्त करणारी आणि जीव देण्याशिवाय पर्याय नसणारी गोष्ट आहे की काय असे वाटावे. मेहबूब खानने प्रेमत्रिकोणात अधिक रंग भरत “अंदाज’ चित्रपटाची निर्मिती केली. “संगम’ नावाचा चित्रपट या प्रेमत्रिकोणात भारतीय प्रेमाचा रंग मिसळला.

गेल्या काही वर्षांत रोमान्सचा बादशहा शाहरूख खानने त्याच्या रोमॅटिंक चित्रपटांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. “कुछ कुछ होता है’ हा शाहरूख खानचा मैत्री आणि प्रेम यांच्यावर आधारित चित्रपट त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट कॉलेज, मित्र आणि प्रेम यावर आधारित असला तरी एक आगळावेगळा प्रेमत्रिकोण होता. तत्पूर्वी 1993 मध्ये शाहरूखच्या जुही चावला, सनी देओल यांच्यासोबत आलेल्या “डर’ या चित्रपटाने प्रेमत्रिकोणाची आणि एकतर्फी प्रेमाची नवी बाजू मांडली. अशाच प्रेमत्रिकोणावर आधारित शाहरूखचा आणखी एक थ्रिलर चित्रपट म्हणजे “अंजाम’. याखेरीज शाहरूखचा सर्वाधिक चर्चिला गेलेला प्रेमत्रिकोणी चित्रपट म्हणजे “देवदास’. याखेरीज “कल हो ना हो’ मध्ये प्रीती झिंटा, सैफ अली खान यांचा प्रेमत्रिकोणही प्रेक्षकांना मनापासून भावला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट “दिल से’हा देखील एसआरकेचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. “दिल तो पागल हैं’ मध्ये शाहरूख खान माधुरी दीक्षित आणि करिश्‍मा कपूरबरोबर दिसला.

बॉक्‍स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केलेल्या ट्रॅंग्युलर लव्हस्टोरीवाल्या चित्रपटांची यादी काढल्यास ती खूप मोठी लांबलचक होईल. “कुछ कुछ होता हैं’, “हम दिल दे चुके सनम’, “दिल तो पागल है’, “कभी हॉं कभी ना’,”बर्फी’, “स्टुडंट ऑफ दी इअर’, “मुझसे दोस्ती करोगे’, “साजन’, “कल हो न हो’, “डर’, “देवदास’, “इश्‍कियां’, “जब तक है जान’, “सिलसिला’, “बाजीगर’, “साहेब, बीवी औऱ गॅंगस्टर’, “ताल’, “सागर’, “कॉकटेल’, “धडकन’ “1942 अ लव्हस्टोरी’, “अंदाज’, “दीवाना मस्ताना’ यासारख्या अनेक चित्रपटांची मोहिनी आजही प्रेक्षकांवर आहे. अलीकडील काळात छोट्या पडद्यावर हे चित्रपट दाखवले जात असतात आणि तिथेही प्रेक्षकांकडून त्यांना उदंड प्रतिसाद लाभतो.

70च्या दशकात अमिताभ आणि रेखा यांच्यातील कथित प्रेमाच्या वार्ता प्रसिद्धीच्या झोतात होत्या. असं म्हणतात की त्यानंतर जया बच्चन यांनी अमिताभला रेखाबरोबर चित्रपट करण्यास मनाई केली होती. आजच्या काळात पाहायचे तर, अभिनेत्री बिपाशा बसूने टीव्ही ऍक्‍टर करण ग्रोव्हरशी लग्न केले आहे; परंतु ती दीर्घकाळ अभिनेता जॉन अब्राहमबरोबर नात्यात गुंतलेली होती. त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली ती 2002 मध्ये. ते दोघेही “जिस्म’ नावाचा चित्रपट करत होते. जॉन हिंदी चित्रपटसृष्टीत नवाच होता पण मॉडेलिंगमध्ये तो नावाजलेला होता. जॉनच्या आधी बिपाशाच्या आयुष्यात दिनो मोरिया होता. त्यांच्या ब्रेकअपनंतर जॉन अब्राहम तिच्या आयुष्यात आला.

बॉलीवूड स्टार अक्षयकुमारची प्रेमप्रकरणे खूप गाजली. आयेशा जुल्का, रवीना टंडन यांच्यानंतर शिल्पा शेट्टीबरोबर त्याचे प्रकरण सुरू झाले. अक्षय आणि रवीना यांचे ब्रेकअप झाल्यानंतर रवीनाच्या जागी शिल्पा शेट्टी आली. त्यांच्या जवळकीच्या चर्चा रंगल्या आणि शिल्पा शेट्टीशी अक्षयकुमार लग्न करणार असे वाटत असतानाच तो ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला. एकीकडे शिल्पा आणि दुसरीकडे ट्विंकल. आता अक्षयकुमार ट्विकल खन्ना एकत्र आहेत. सौंदर्यवती ऐश्‍वर्या रायवरून सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात अजूनही विस्तव जात नाही. सलमाननंतर ऐश्‍वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला पण अनेक वादविवाद, मतभेदांनतर ऐश्‍वर्याने विवेकपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.