#Moviereview: प्रभावहीन ‘साहेब, बीबी और गँगस्टर 3’

अभिनेता संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ साध्य बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई करतोय. त्या नंतर आता खुद्द संजय दत्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ‘साहेब, बीबी और गँगस्टर 3’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. दिग्दर्शक त्रिमांशु  धूलिया यांच्या ‘साहेब, बीवी और गँगस्टर ’ या सीरीज मधील हा तीसरा चित्रपट आहे. यापूर्वी रणदीप हुडा आणि इरफान खान यांनी गँगस्टर साकारला होता, यात संजय दत्त गँगस्टर बनला आहे.
‘साहेब बीबी और गँगस्टर3’ ची कथा  ‘साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न’ हा दूसरा  भाग जिथे संपतो, तिथून सुरु होते.  महाराणी माधवी ( माही गिल) ही एक प्रतिथयश राजकिय नेता बनली आहे. पैशाचे आणि संपत्तीचे वाद निकाली काढणे, राजकीय वाटाघाटींमध्ये पुढाकार घेणे अशा कामातून तिने राजकारणात आपला  दबदबा निर्माण केला आहे. पण यासोबतचं तिच्या व्यभिचाराचे किस्सेही प्रसिद्ध आहेेत. घराचा अख्खा कारभार आणि सवत रंजना (सोहा अली खान) अशी सगळी सूत्रे ती आपल्या हातात घेते.
राजा आदित्य प्रताप सिंग ( जिमी शेरगिल) तुरुंगात अड़कुन पडलेला आहे. पण तिथून बाहेर पडल्यावर आपल्या पत्नी आणि कुटुंबापेक्षा शत्रूंवर सूड उगवून गेलेले वैभव परत कसे मिळवायचे, या स्वप्नरंजनात तो मश्गुल आहे,  दूसरीकडे रंजनाचे दारूचे व्यसन इतके वाढते की, तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. याच समीकरणात उदय प्रताप सिंग ( संजय दत्त) याची एन्ट्री होते. उदय प्रताप सिंग बुंदीगढ राज्याचा राजकुमार आहेे त्याचा स्वभाव आणि अविवेकीपणामुळे तो हद्दपार झालेला आहे आणि लंडनमध्ये एक नाईट क्लब चालवतो.
रशिय रौलेट हा गेम जिंकून उदयप्रतापने लंडनचा हा नाईटक्लब जिंकलेला असतो. लग्न झालेले असूनही त्याचे सुहानी (चित्रांगदा सिंह) या  डान्सरवर प्रेम आहे, दरम्यान या नाईटक्लबमध्ये उदयच्या हातून च्या खून होतो यामुळे त्याला परत भारतात यावे लागले, इथे त्याला आपल्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटा पाहीजे. पुढे त्याची नि माधवीची ओळख होते आणि घनिष्ठ मैत्रीही. ह्या मैत्रीपोटी माधवी उदयला एका खोट्या खुनाच्या प्रकरणातून वाचवते पुुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘साहेब बीबी और गैंगस्टर3’ बघायला हवा.
सत्तेचा भुकेला एक रंगेल राजा, त्याचे प्रेम जिंकू पाहणारी पण राजाकडून कायम अवहेलना झेलणारी एक एकाकी राणी आणि त्या राणीला जिवापाड जपू पाहणारा तिचा गुलाम असे गुरूदत्तच्या कथेतील त्रिकूट. गुरूदत्त यांनी पडद्यावर रंगवलेल्या याच कथेतील ‘गुलाम’ गाळून दिग्दर्शक त्रिग्मांशू धूलिया यांनी त्याजागी एक गँगस्टर आणला आहे.अनेक व्यक्तिरेखा आणि या प्रत्येक व्यक्तिरेखेची पार्श्वभूमी पाहता आपल्याला वैताग येतो. रंजनाचा विश्वासू नोकर आणि त्याची इंग्लिश बोलणारी मुलगी दीपल, रंजनाचे वडिल, त्यांचा स्त्रीलंपट पुतण्या, उदय प्रतापचे भ्रष्ट वडिल व भाऊ आणि त्यांची आई अशा अनेकांचा भूतकाळ सांगता सांगता चित्रपटाचा मध्यांतर होतो आणि मध्यवर्ती कथाचं विसरली जाते. आदित्य प्रताप सिंग आणि माधवीचे गुंतागुंतीचे संबंध आणि त्यांचे परिस्थितीसापेक्ष बदलणे हे एवढे सोडले तर कथेत कुठलेच स्थैर्य नाही.
कलाकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर  जिमी शेरगिल आणि माही गिल यांनी आपआपल्या व्यक्तिरेखा उत्तम साकारल्या आहेत. पण संजय दत्त आणि चित्रांगदा या दोघांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाच्या चौकटीत फिट  बसत नाहीत यामुळे त्यांचा प्रभाव दिसत नाही, कबीर बेदी, दीपक तिजोरी आणि बाकी कलाकार ठीक आहेत.
अनेक व्यक्तिरेखा आणि अनपेक्षित वळणांमुळे कथा हळूहळू निरस वाटू लागते. मध्यांतरानंतर तर हा चित्रपट कंटाळवाणा वाटतो, चित्रपटाचे संगीत ही कमकुवत आहे, एकंदरीत सांगायचे तर पूर्वीच्या दोन भागांच्या तुलनेत हा कमजोर चित्रपट आहे, यामुळे प्रभावहीन असलेला ‘साहेब, बीबी और गँगस्टर3’ बघायला हवा असे नाही.
चित्रपट – साहेब, बीबी और गँगस्टर3
निर्मिती – राहुल मित्रा
दिग्दर्शक – त्रिमांशु धुलिया
संगीतकार – राणा मजूमदार, अंजान भट्टाचार्य
कलाकार – जिमी शेरगिल, माही गिल,संजय दत्त, कबीर बेदी,दिपक तिजोरी
रेटिंग – 1.5
-भूपाल पंडित
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)