खेळपटांची सुगी (भाग-१)

सोनम परब
खेळांमध्ये संघर्ष असतो म्हणूनच क्रीडाविश्‍वाने अनेक चित्रपटांना कथानके पुरविली. आजकाल खेळांवर आधारित चित्रपट निर्मितीची पुन्हा एकदा लाट दिसून येते. अनेक खेळाडूंवरील “बायोपिक’ पडद्यावर येत आहेत. यापूर्वीही खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांना भरपूर प्रतिसाद लाभला आहे. हॉकीपटू संदीप सिंह यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात क्रीडाविश्‍वावर आधारित अनेक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यातील कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हेच आता पाहायचे.
भारतीय हॉकीपटू संदीप सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट (बायोपिक) 13 जुलैला पडद्यावर झळकला आहे. दिग्दर्शक शाद आली यांच्या या चित्रपटात संदीप सिंह यांच्या जीवनातील प्रसंग, विशेषतः त्यांना गोळी लागून ते व्हीलचेअरवर कसे पोहोचले आणि दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या जोरावर भारतीय संघात त्यांनी “कमबॅक’ कसे केले, हा घटनाक्रम ठळकपणे चित्रित करण्यात आला आहे. संदीप सिंह यांच्याविषयी फारशी माहिती नसलेल्या व्यक्तींनाही या चित्रपटामुळे त्यांच्या जीवनाविषयी माहिती मिळते. संदीप यांची भूमिका पडद्यावर दिलजित दोसांज यांनी साकारली आहे. तापसी पन्नू आणि अंगद बेदी यांनी संदीप सिंह यांना त्यांच्या संघर्षकाळात मदत करणाऱ्या व्यक्तींची पात्रे रंगविली आहेत.
क्रीडाविश्‍वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत सुपरहिट ठरले आहेत. यात प्रियांका चोपडाची प्रमुख भूमिका असलेला “मेरी कोम’ आणि प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित “भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश आहे. या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटसृष्टीत “ए ग्रेड’चे कलावंत मानल्या गेलेल्या प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर यांनी क्रीडापटूंची जीवनगाथा साकारण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. क्रीडाविश्‍वाशी संबंधित चित्रपटांची निर्मिती करण्यातील बॉलीवूडचे गांभीर्य यातून दिसून येते. अन्यथा कामचलाऊ स्वरूपातच क्रीडाविश्‍व साकारण्याचा शिरस्ता बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे दिसून येत होता.
छोट्या निर्मात्यांनी असे चित्रपट तयार केले; परंतु पैशांअभावी तंत्रज्ञानाचा वापर त्यांना पुरेशा प्रमाणात करता आला नाही. मुळातच क्रीडापटूची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याला वा अभिनेत्रीला कसून तयारी करावी लागते. परंतु बॉलीवूडमधील अभिनेते एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या निर्मितीत व्यस्त असतात. अशा स्थितीत क्रीडाविश्‍वावर आधारित उत्तम चित्रपट तयार करण्याचा विषयच मुळात निकाली निघतो. तरीही लहान-मोठ्या अभिनेत्यांनी खेळाडूंची भूमिका अनेकदा साकारली आहे. चिनी मार्शल आर्टवरही बॉलीवूडमध्ये चित्रपट तयार करण्यात आले आहेत. परंतु यातील प्रमुख कलावंत मार्शल आर्टमध्ये निपूण असल्याचे दिसते. हे चित्रपटही मार्शल आर्ट या क्रीडाप्रकाराभोवती केंद्रित होण्याऐवजी नायकाच्या व्यक्तिगत जीवनाभोवती केंद्रित असल्याचे आणि हिंसक दृश्‍यांसाठीच मार्शल आर्टचा वापर या चित्रपटांतून झाल्याचे दिसते.
अजय देवगणचा “जिगर’, देब मुखर्जीचा “कराटे’, सुनील शेट्टीचा “फाइट क्‍लब: मेंबर्स ओन्ली’, अक्षयकुमारचा “चॉंदनी चौक टू चायना’ अशा चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ब्रदर्स, रिश्‍ते यांचाही उल्लेख ओघाने येणे स्वाभाविक आहे.
फुटबॉलवर आधारित चित्रपटांत प्रकाश झा यांचा राजकिरण अभिनित “हिप हिप हुर्रे’ आणि अनिल गांगुली यांचा अनिल कपूर, अमृता सिंग अभिनित “साहेब’ हे दोन चित्रपट उल्लेखनीय आहेत. “हिप हिप हुर्रे’ हा निव्वळ क्रीडापट होता, तर अनिल गांगुली यांच्या “साहेब’ चित्रपटात नाट्य अधिक होते.
चित्रपटातील नायक अनिल कपूर हा एक फुटबॉलपटू आहे; पण महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी कुटुंबाला मदत करण्यासाठी त्याला किडनी विकावी लागते, असे या चित्रपटाचे कथानक आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त तू है मेरा संडे, मान्सून फुटबॉल, धन धना धन गोल, स्टॅंड बाय, इन्शाल्लाह फुटबॉल, सिकंदर, फुटबॉल शुटबल हाय रब्बा आणि द गोल या चित्रपटांत फुटबॉल आणि त्याच्याशी संबंधित राजकारणाचे चित्रण करण्याचा प्रयत्न दिसून आला. फुटबॉलवर आधारित चित्रपट यशस्वी होण्याचे प्रमाण देशात पन्नास टक्के राहिले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)