खेळपटांची सुगी (भाग-२)

सोनम परब 
खेळांमध्ये संघर्ष असतो म्हणूनच क्रीडाविश्‍वाने अनेक चित्रपटांना कथानके पुरविली. आजकाल खेळांवर आधारित चित्रपट निर्मितीची पुन्हा एकदा लाट दिसून येते. अनेक खेळाडूंवरील “बायोपिक’ पडद्यावर येत आहेत. यापूर्वीही खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांना भरपूर प्रतिसाद लाभला आहे. हॉकीपटू संदीप सिंह यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात क्रीडाविश्‍वावर आधारित अनेक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यातील कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हेच आता पाहायचे. 
सर्वाधिक हिंदी क्रीडापट क्रिकेट या खेळावर आधारित होते. देवानंदसारखे कलावंत आणि निर्मातेही क्रिकेटचे शौकीन होते. “मालामाल’ हा आमीर खानसोबत त्यांनी तयार केलेला चित्रपट याची साक्ष देतो. परंतु या चित्रपटाला अपयश आले. क्रिकेटवरील अन्य चित्रपटांमध्ये क्रिकेटर, ऑलराउंडर, इकबाल, स्टंप्ड, लगान, चमत्कार, मीराबाई नॉट आउट, सलाम इंडिया, चेन खुली की मेन खुली, हॅट्ट्रिक, व्हिक्‍ट्री, किरकिट, कई पो चे, पटियाला हाउस, दिल बोले हडप्पा, चले चलो, ढिशूम, अजहर, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, सचिन: अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटांचा समावेश आहे.
 क्रिकेटव्यतिरिक्त स्केटिंग या खेळावर आधारित हवा हवाई, सायकलिंग खेळावर आधारित आमीर खानचा जो जीता वही सिकंदर, सायकिल किक, स्टुडंट ऑफ द इयर यांसारखे चित्रपट तयार करण्यात आले. ऍथलेटिक्‍सवर भाग मिल्खा भाग, बुधिया सिंह: बॉर्न टू रन, अहसास अ फीलिंग. 42 किलोमीटर आणि पानसिंह तोमर असे चित्रपट प्रदर्शित झाले. सुप्रसिद्ध कुस्तीपटू दारासिंह हे वर्ल्ड चॅम्पियन होते. किंग कॉंग चित्रपटाद्वारे त्यांचे पडद्यावर आगमन झाले. रुस्तुमसारख्या अनेक चित्रपटांत कुस्तीशी संबंधित राजकारणावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. दारासिंह यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त अनिल कपूर यांचा चमेली की शादी हा हास्यपट, सुलतान हा सलमान खानचा गंभीर चित्रपट तर आमीर खानचा दंगल हा “बायोपिक’ हे कुस्तीवर आधारित काही यशस्वी चित्रपट होत.
आगामी काळातही क्रीडाविश्‍वावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रीमा कागती यांनी दिग्दर्शित केलेला अक्षयकुमारचा गोल्ड हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात 1948 च्या लंडन ऑलिम्पिक
स्पर्धेत भारतीय संघाने मिळविलेले सुवर्णपदक आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच टीमचा झालेला सन्मान चित्रित करण्यात आला आहे. दुसरीकडे कबीर खान क्रिकेटवर आधारित चित्रपट तयार करीत आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 मध्ये क्रिकेटचा विश्‍वचषक पटकावला होता. चित्रपटात याच स्पर्धेचे चित्रण असेल. रणवीरसिंह कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. शूटर अभिनव बिंद्राने प्रथम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, तो क्षण केंद्रिभूत मानून एक चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे.
बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकले तो क्षण केंद्रस्थानी ठेवून पडद्यावर येत असलेल्या चित्रपटात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, परुपल्ली कश्‍यप, श्रीकांत किदम्बी आदी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या जीवनावर तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गोपीचंद यांची भूमिका सुधीर बाबू साकारणार आहे. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात वरुण धवन ध्यानचंदांच्या भूमिकेत दिसणार आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत जागतिक विक्रम नोंदविणारे मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार असून, पेटकर यांची भूमिका सुशांतसिंह राजपूत साकारणार आहे. याखेरीज बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, धावपटू पी. टी. उषा आणि क्रिकेटपटू मिथिला राज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही तयार होत आहेत. दिग्दर्शक अश्‍विनी अय्यर तिवारी कबड्डीवर आधारित चित्रपट तयार करणार असल्याचेही वृत्त असून, महिला कबड्डीपटूची भूमिका कंगना रानौत साकारणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)