“एचए’ला उभारी देण्यासाठी हालचाली

कामगारांचा 27 महिन्यांचा पगार थकीत : केवळ पॅकेजचीच घोषणा

पिंपरी – पिंपरीतील हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्‍स कंपनीतील कामगारांचा 27 महिन्यांचा थकीत पगार, पॅकेज जाहीर होऊनही कामगारांना न मिळालेली रक्‍कम अशा परिस्थितीत या कंपनीची नव्याने उभारी देण्यासाठी हालचालींना वेग येऊ लागला आहे. कामगारांचा थकीत पगार, स्वेच्छानिवृत्तीसाठी जाहीर झालेली रक्‍कम मिळावी, यासाठी तसेच कंपनीला नव्याने उभारी देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी दिल्ली येथे केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्यासोबत कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

एचए कंपनीतील कामगारांचा 27 महिन्यांचा पगार थकीत आहे. स्वेच्छानिवृत्ती आदींसाठी जाहीर केलेली 280.17 कोटी रुपयांची रक्कम अद्याप कामगारांना मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी, तसेच कंपनीची नव्याने उभारणी कशी करता येईल, याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी बैठक होणार असल्याचे हिंदुस्थान ऍन्टीबायोटिक्‍स मजदूर संघाचे अध्यक्ष मनोज कोटक यांनी सांगितले. एच.ए मजदूर संघाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एच.ए कंपनीच्या पुर्ननिर्माणासाठी केंद्र सरकारने 821.17 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांचा थकीत पगार, ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी, वेतन फरकाची रक्कम आदींचा समावेश आहे. त्यातील 100 कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर, कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीची रक्कम आणि 27 महिन्यांचा थकीत पगाराची रक्कम असे एकूण280.17 कोटी रुपयांची रक्कम देण्याचे केंद्र सरकारने जुलै महिन्यात जाहीर केले होते. मात्र, अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी बैठकीमध्ये एच.ए मजदूर संघातर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

450 कामगारांनी भरले स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज
कारखान्यात सध्या अधिकारी व कर्मचारी असे एकूण 900 जण कार्यरत आहेत. कंपनीला कामगारांच्या थकित पगाराच्या रकमेपोटी सुमारे 81 कोटी रुपये द्यायचे आहेत. कंपनीची गेल्या वर्षभरात 66 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कंपनीतील सुमारे 450 कामगारांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरलेले आहेत. तथापि, त्यांनी अद्याप स्वेच्छानिवृत्ती घेतलेली नाही. संबंधित कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर कंपनी कशा पद्धतीने चालविता येईल, कंपनीमध्ये स्ट्रॅटेजिक सेल स्थापन झाल्यानंतर काय होईल किंवा स्ट्रॅटेजिक सेलशिवाय अन्य काही पर्याय आहेत का, याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेला गती देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री लागणार आहे. त्याशिवाय, कंपनीकडे मोठ्या प्रमाणात जागा आहे, त्याबद्दल काय करता येईल, आदी मुद्दयांवरही बैठकीत चर्चा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.