इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ब्रिटनमधून आणण्याच्या हालचालींना गती दिली आहे. वैद्यकीय उपचारांसाठी शरीफ नोव्हेंबर 2019 पासून लंडन मुक्कामी आहेत.
शरीफ यांच्या विरोधात पाकिस्तानमधील विविध न्यायालयांत भ्रष्टाचाराचे खटले प्रलंबित आहेत. त्यावरून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच शरीफ यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले.
न्यायालयाने आत्मसमर्पण करण्याचा आदेश देऊनही शरीफ हजर न राहिल्याने ते पाऊल उचलण्यात आले. शरीफ यांना लंडनहून परत आणण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
त्या घडामोडीनंतर मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत इम्रान यांनी शरीफ यांच्या प्रत्यार्पणासाठी वेगाने पावले उचलण्याचा आदेश दिला.
शरीफ यांचे प्रत्यार्पण केले जावे, अशी विनंती याआधी पाकिस्तानकडून ब्रिटन सरकारला करण्यात आली होती. मात्र, दोन्ही देशांत प्रत्यार्पणाचा करार नसल्याने त्या विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही. दोन दिवसांपूर्वीच शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली.