माहिती तातडीने सादर करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आदेश
अभ्यासासाठी संयुक्त समितीही लवकरच
पुणे – राज्यातील शाळांमधील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत माहिती सादर करा, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी माध्यमिक शिक्षणाधिऱ्यांना दिले आहेत.
सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व तुकड्यांवर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या अभ्यासासाठी संयुक्त समितीही गठीत करण्यात आलेली आहे. या समितीकडे सविस्तर माहिती सादर करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक, शिक्षण निरीक्षक यांच्याकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबतची माहिती मागविण्यात आलेली आहे. जिल्ह्यांची एकत्रित माहिती ई-मेलवर सादर करावी. याबाबत कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.