पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणताच निर्णय घेतलेला नाही. यामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत.
प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी काळ्या फिती लावून राज्यातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे.
मूल्यांकन प्राप्त व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे, वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या पदांना मान्यता देवून वेतन सुरू करावे, आयटीच्या 10 हजार शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन अनुदान द्यावे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही लागू करावी, आदी मागण्या महासंघाने शासनाकडे बऱ्याचदा केल्या आहेत.
त्यावर चर्चा झाल्या. पोकळ आश्वासनेही देण्यात आली. महासंघाने बैठकीसाठी वेळ मागितली होती. मात्र, ती अद्याप मिळालेली नाही.
त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदनही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे.