पिंपरी – दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने पिंपरी येथील डेअरी फार्मच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. सायंकाळी कंत्राटदार पगार देण्यास तयार झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. डेअरी फार्ममध्ये सध्या 190 कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने प्रवेशद्वारासमोर जमा होत काम बंद आंदोलन सुरू केले. डेअरी फार्म सध्या तोट्यात सुरू आहे, असे कारण सांगून पगार देण्यास उशीर केला जात आहे.
जनावरांना चारा कमी प्रमाणात मिळत आहे, अशी तक्रार राजेश यादव, विनोद यादव, जनार्दन लोंढे यांनी केली. चारा कापण्यासाठीची मजुरीही वाढवून द्यायला हवी, अशी मागणी सविता कवळे, अलका पवार, रेखा कापरे, नंदा तिरकुडे यांनी केली. कंत्राटदार हरीशंकर यादव यांनी दोन महिन्यांचा पगार देण्याची तयारी दर्शविली आहे. पगार 10 तारखेच्या आत मिळेल असे लेखी द्या, अशी भूमिका कामगारांनी घेतली. कंत्राटदार यादव म्हणाले, “”दोन महिन्यांपासून कामगारांच्या पगाराचे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे उशीर झाला. आज पैसे मिळाले असून पगार देणार आहे. आजारपणामुळे काही जनावरांचा मृत्यू झाला. चारा कमी मिळत असल्याची तक्रार चुकीची आहे. जनावरांना पुरेसा चारा दिला जात आहे.”