साखर संकुलाच्या इमारतीवर चढून प्रहार संघटनेचे आंदोलन

पुणे – थकीत एफआरपीच्या मागणीसाठी आज प्रहार संघटनेतर्फे साखर संकुलाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यात  आले. तसेच आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तांना घेरावही घालण्यात आला.

सन.2018-19 गळित हंगाममधील राज्यातील कारखानदारंकडून 31 मे 2019 अखेरीस 1500 कोटी व सोलापूर आणि सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे 600 कोटी रूपये एफ. आर. पी. ची रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. वास्तविक ऊस गेल्यानंतर 14 दिवसात एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असताना आणि गळीत हंगाम संपून चार महिने उलटल्यानंतर सुध्दा एफआरपीच्या रक्कमे पैकी 1500 कोटी रूपये अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

एफआरपीची पूर्ण रक्कम मिळण्याकरिता यापुर्वी 4 मे 2019 रोजी निवेदन दिले. त्यानंतरही कारखानदारांकडून शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळालेली नाही. आज रोजी शेतकऱ्यांना येणे असलेली रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात मिळावी. एफ. आर. पी. (आर. एस. पी.) काढण्यासाठी कारखान्यांनी शासनाला कोणती माहिती सादर केली? कधी सादर केली ? लेखापरिक्षक कोण आहेत ? यासह लेखापरिक्षकांनी माहिती मंजूर अथवा नामंजुर कधी केली, याची सर्व माहिती त्या काराखान्याच्या सभासदांसाठी अथवा ऊस उत्पादकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी.

त्याचबरोबर शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम मिळण्यासाठी शासनाने कारखान्यास कोणत्या दिवशी नोटिस पाठविली व त्या नोटिशीस कारखान्याकडून कोणते उत्तर मिळाले ही माहिती शेतकऱ्यांना ऑनलाईन उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या कडून योग्य त्या उपाय योजना व्हाव्यात. ऊस बिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी यासाठी ऍप तयार केला आहे, त्याच्या त्रुटी दूर करून आठ दिवसात तो ऍप चालू करू अशी माहिती आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून दिली होती तो ऍप तातडीने चालू व्हावा, अशा मागण्या प्रहार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.