करोनायोद्ध्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष : वायसीएम आणि जिल्हा रुग्णालयात निदर्शने
पिंपरी / पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांनी आज दोन तास कामबंद आंदोलन केले. तर जिल्हा रुग्णालयातील काही परिचारिका रुग्णसेवेत होत्या तर उर्वरित परिचारिकांनी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
महाराष्ट्र शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला होता. पण, शासनाने व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे हे आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन केले. यावेळी वायसीएममधील सर्व परिचारिका, कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस असोसिएशन पुणे यांच्या वतीने परिचारिकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली. या वेळी रुग्णसेवा खंडित न करता काही परिचारिकांना सेवेत ठेवून निदर्शने करून परिचारिकांनी रुग्णाची काळजी घेतली. निदर्शने पुणे नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर, अतिरिक्त सचिव रेखा थिटे, औंध पुणे जिल्हा रुग्णालयाचे सहसचिव प्रेरणा भद्रे, अरुणा जाधव यांनी निदर्शने आयोजित केले होते. या वेळी रुग्णालयातील वैशाली कर्डिले, प्रियांका जाधव, सरवदे सिस्टर, सुनिता कुंभार, दीपा माने, निवेदिता जवेहरी, मंगल पांढरे यांनी निदर्शने यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या आहेत मागण्या
महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली 6000 पदे तातडीने भरावी. कंत्राटीकरण करु नये. परिचारिकांना रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी. कोविडबाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार पीपीए किट, एन-95 मास्क व इतर साहित्य त्वरित मिळावे. कोविडड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी. ह्रृदयरोग, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविडड्युटी मध्ये सूट मिळावी.
तसेच कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यू झाल्यास शासनाने घोषित केलेली 50 लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी. वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी. परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना 300 रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो, त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा. कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.