धनगर समाजाचे फलटणला ठिय्या आंदोलन

फलटण  – धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे व अनुसूचित जमातीच्या सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी फलटण तहसीलदार कचेरीसमोर मंगळवारी13 ऑगस्ट रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी समस्त सकल धनगर समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

तालुक्‍यातील धनगर समाजातील नेतेमंडळीं, युवक, युवती व समाजबांधव मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे आयोजन समस्त सकल धनगर समाज फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आले. धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्याबरोबरच समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जुलै 2014 मध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे भाजपचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचबरोबर 5 नोव्हेंबर 2017 च्या नागपूरला झालेल्या निर्णायक मेळाव्यात सरकार धनगरांना आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. मात्र, अजूनही धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही.

विधानसभा व विधानपरिषदेच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये धनगर आरक्षणावरून गदारोळ झाला. अनेकदा सभागृह तहकूब करावे लागले. पण, या प्रश्‍नावर अजूनही तोडगा निघालेला नाही. सरकारकडून वेळकाढू व कुचराईपणा होताना स्पष्टपणे दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र लागू केले नाही तर सरकारला धनगर समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या धनगर समाजाच्या आरक्षण याचिकेमध्ये शासनाच्या वकिलांनी हजर राहण्याचे सांगून तत्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी समाजाची मागणी आहे.

या आंदोलनास जिल्हा परिषद सदस्य सौ. भावनाताई सोनवलकर, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेवक कुमार शिंदे, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत, यशवंत खलाटे, नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, भाऊसाहेब कापसे, महाबळेश्‍वरचे ओबीसी. एनटी पार्टीचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, सोनार समाजाच्या वतीने नगरसेवक अजय माळवे, नगरसेवक पांडुरंग गुजवटे, रामोशी समाज संघटनेच्या वतीने अनिल शिरतोडे, फलटण शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, सुधीर अहिवळे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड. नरसिंह निकम, प्रयाग सामाजिक संस्थेच्या सौ. भोजने, “रासप’च्या सौ. कल्पना गिड्डे, सौ. मोनाली शिंत्रे, मुस्लिम समाजाच्या वतीने माजी संचालक सिराज भाई शेख यांसह युवक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.