पिंपरी – दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कामगारांना किमान वेतन दर व इतर विविध सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. सफाई कामगार महासभेचे संदीपान झोंबाडे, कष्टकरी कामगार पंचायतीचे कार्याध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
शहरात दैनंदिन साफसफाईचे काम ठेकेदारी पद्धतीने केले जाते. महापालिका किमान वेतन दराप्रमाणे वेतन अदा करते. परंतु, ठेकेदारांकडून कामगारांचे एटीएम, बॅंक पासबूक काढून घेतले जाते. बॅंक स्लिपवर कामगारांची स्वाक्षरी घेऊन पैसे काढून घेतले जातात, असा आरोप यावेळी झालेल्या सभेत करण्यात आला.
करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार कामगारांचे किमान वेतन त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे, साप्ताहिक सुट्टीचे वेतन देण्यात यावे, त्यांना सुरक्षा साधनांचे वाटप करावे, कामगारांची बॅंक पासबूक, एटीएम कार्ड ठेकेदारांकडे आहेत, अशा ठेकेदारांवर कारवाई करावी, कामगारांचे किमान वेतन लाटणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.