नोकरदारांची मोहिम आठवडाभर चालणार
हॉंगकॉंग : हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीवादी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्योग-व्यवसायातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक अभिनव शक्कल शोधून काढली आहे.
हे कर्मचारी दुपारी जेवणाच्या सुटीमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. हा संपूर्ण आठवडाभर कर्मचाऱ्यांचे हे अर्धवेळ आंदोलन सुरू राहणार आहे.
हॉंगकॉंगमधील आंदोलनाला अमेरिकेकडून पाठिंबा दर्शवल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी रविवारी काढण्यात आलेल्या मोर्च्यावर पोलिसांनी अश्रुधुर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला होता. मात्र सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्च्याच्यावेळी असा कोणताही संघर्ष झाला नाही. या मोर्च्यातील सहभागानंतर अनेक कर्मचारी आपापल्या कार्यालयांमध्ये कामासाठी निघून गेले. तर उर्वरित लोकांनी पुढील पाच दिवसांच्या आंदोलनामध्येही सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि निवृत्त ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. याशिवाय मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्तींनीही रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला होता. रविवारपासून जाहिरात क्षेत्रातील कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले आहेत. आंदोलनाला व्यापक जनप्रसिद्धी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.