भामाआसखेडच्या पाण्यासाठी आंदोलन

सर्वपक्षीय आंदोलनात भाजप नगरसेवकांचा सहभाग

पुणे (प्रतिनिधी) –शहरातील बहुचर्चित भामा आसखेड योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी महापालिका मुख्यसभेत आंदोलन केले. यामध्ये भाजपचे नगरसेवकही सहभागी झाल्याने पक्षाला हा घरचा आहेरच ठरला. ही योजना “डस्टबीन’ झाली आहे, असा थेट आरोप भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी केला.

साडेतीन किमी लांबीच्या जलवाहिनीचे काम आंदोलनामुळे थांबले आहे. पोलीस बंदोबस्तात हे काम लवकरच सुरू करून मार्च 2020 अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाच्या वतीने सभागृहात देण्यात आले.
मुख्यसभा सुरू होताच भामा आसखेडचे पाणी कधी मिळणार? आम्हाला पाणी द्या, अशा मजकुराचे फलक हाती घेऊन भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन आंदोलन केले. त्यांच्याबरोबर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहभागी झाले. भाजपचे नगरसेवक अनिल टिंगरे, मुक्‍ता जगताप, बापुराव कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, गणेश ढोरे, योगेश मुळीक, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक नाना भानगिरे, अविनाश साळवे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप, प्रकाश कदम, विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, रफिक शेख, कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आदी सहभागी झाले होते.

डिसेंबरपर्यंत भामा असखेड योजना पूर्ण होईल, असे संगितले जात आहे. परंतु, योजनेचे काम बंद आहे. लष्कर केंद्रातून पाणी पुरवठ्याची वाहिनी फुटल्याने दोन दिवसांपासून पाणी नाही. मीटर लावल्याने पाणी चढत नाही. आमच्या भागात भामा आसखेड योजनेचे पाणी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मीटर लावू नयेत, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. भामा आसखेड प्रकल्प कधी पूर्ण होणार, याचा खुलासा करावा. महेंद्र पारे म्हणाले, अजित पवार पालकमंत्री असताना भामा आसखेड योजनेचे काम सुरू झाले. स्थानिक एजंट शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईतून कमिशन खात आहेत. या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करावे, असे मुळीक म्हणाले.

महापालिकेची इच्छाशक्‍ती नसल्याने काम रखडल्याचा आरोप साळवे यांनी केला. तर अडीच वर्षे झाली 11 गावे पालिकेत समाविष्ट होऊन, परंतु आजही अनेक गावांत 8-10 दिवस पाणी येत नाही, असे सांगून ढोरे यांनी पाणी येत नाही तोपर्यंत मिळकत भर भरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

भामा आसखेड पाणीपुरवठा योजना 380 कोटी रुपयांची आहे. या योजनेचे साडेतीन किमी लांबीच्या जलवाहिनीचे काम आंदोलनामुळे रखडले आहे. हे काम सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होईल. खडकवासला धरणाची कालवा दुरुस्तीनिमित्त बंद असल्याने फुरसुंगी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी पुरवठ्यासंबंधिच्या कामांसाठी निविदा काढल्या आहेत.
-व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागप्रमुख, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.