स्वित्झर्लंड : देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता अनिवासी भारतीयांनीही जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या कायद्याचा विरोध दर्शविला आहे.
मात्र या सर्वांमध्ये सध्या चर्चेत आहे अलिबागचा एक युवक ज्याने थेट स्वित्झर्लंडच्या संसदेसमोर कपडे काढून आंदोलन केले. स्वित्झर्लंडची राजधानी असणाऱ्या बर्न शहरामध्ये मूळ अलिबागच्या असणाऱ्या हर्षल काटे याने हे अनोखे आंदोलन केले आहे.
मुंबई आयआयटीचा विद्यार्थी असणारा हर्षल हा सध्या दिल्ली आयआयटीमधून पीएचडी करत आहे. याच संदर्भात तो सध्या स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर आहे. हर्षलचा सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध आहे.
आपला विरोध दर्शवण्यासाठी त्याने थेट स्वित्झर्लंडची राष्ट्रीय बॅंक आणि संसदेसमोर कपडे काढून आंदोलन केले. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करणारा हर्षल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणीशी मानणारा होता.
मला देशभक्ती म्हणजेच सर्वकाही आहे असे वाटायचे. पाकिस्तानला द्वेषाशिवाय इतर काहीच मिळू नये या मताचा मी होतो. मात्र हळूहळू मला देशभक्ती आणि अंध भक्तीमधील फरक लक्षात आला. मी अंधभक्त होतो हे मला कळून चुकले, असे हर्षलने सांगितले.