पुणे: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईसह पुणे शहरात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळले होते. नंतरच्या काळात पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश आलं. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतरही ही संख्या आटोक्यात आणण्यात अद्याप यश आलं नाही.
त्यामुळे अर्थकारणाला गती देण्यासाठी प्रशासनाने आता फक्त कंटेन्मेंट झोनमधीलच निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील खुल्या केलेल्या 97 टक्के रस्त्यावरचा बंदोबस्त हलवला आहे. पुण्यातील रस्त्यावरच्या वाहतुकीवर आता पोलीस नियंत्रण ठेवणार नाहीत. यामुळे शुक्रवारी रस्त्यावर कोठेही पोलिस बंदोबस्त दिसला नाही.
मात्र अप्पा बळवंत चौक आणी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स तसेच होते. तर बाजीराव रस्त्यावरील बॅरिकेट्स अभिनव चौकात नागरिकांनी स्वत: हटवून रस्ता खुला केला होता. तर अलका चौकातील बॅरिकेटस पोलिसांनी स्वत: काढून रस्ता वाहतूकीस खुला केला.