मुंबई – ‘हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर्स स्टोन’ आणि ‘स्टार वॉर्स: रिटर्न ऑफ द जेडी’ सारख्या दर्जेदार हॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता पॉल ग्रांट यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी पॉलने जगाचा निरोप घेतला, या बातमीने चाहते आणि मनोरंजन जगतातील स्टार्स सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती त्याची मुलगी जेन ग्रँट हिने दिली आहे.
पोलिसांना 16 मार्च रोजी उत्तर लंडनमधील किंग्ज क्रॉस स्टेशनच्या बाहेर पॉल सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पॉल ग्रँटची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्याचा ब्रेन डेड झाल्याचे उघड केले. तेव्हापासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पॉल यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पॉल यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेक हॉलिवूड कलाकारांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पॉल 1980 च्या दशकात विलो आणि लिबरथंथ या चित्रपटांमधून प्रसिद्ध झाला. त्यानंतर हॅरी पॉटर आणि स्टार वॉर्स सारख्या चित्रपटातून तो जगभरात लोकप्रिय झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मारिया ड्वायर, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
पॉलच्या जाण्यानं संपूर्ण हॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पॉलला श्रद्धांजली अर्पण केली. पॉलने हॅरी पॉटरमध्ये साकारलेली भूमिका त्याची सर्वात हटके भूमिका होती. हॅरी पॉटरमध्ये तिजोरींचे रक्षण करणाऱ्यांपैकी एक असलेला पॉल त्याच्या निराळ्या लूकमुळे सदैव स्मरणात राहील.