भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी दुःखद बातमी समोर आली आहे. मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजी यांचा भरधाव कार पुलाखाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा गेवराई तालुक्यातील चकलांबा गावानजीक एक भरधाव कार पुलावरुन खाली पडून भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार या दाम्पत्यांचा मृत्यू झाला आहे. मृत दाम्पत्य माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण व भावोजी असल्याची माहिती समोर आली आहे.
मृत तगडपल्लेवार दाम्पत्य पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दुर्देवी अपघात झाला. तिंतरवणी येथे ही गाडी भरधाव असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.