पुणे – राष्ट्रीय माऊंटन बायकिंग स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार प्रणिता सोमण हिने महिलांच्या विभागात आणखी एक सुवर्णपदकाची कमाई करताना स्पर्धेत सुवर्ण हॅट्ट्रिक साकार केली. तिने स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी 18.5 कि.मी. अंतराची शर्यत जिंकली. त्यापूर्वी तिने 18.4 कि.मी. आणि मिश्र रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.
महिलांची 18.5 कि.मी. अंतराची शर्यत काहिशी संथ झाली. पण, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले यात शंका नाही. प्रणिताने 1 तास 10 मिनिट 29.619 सेकंद अशी वेळ दिली. ही वेळ देताना तिचा सायकलिंगचा वेग ताशी 15.75 कि.मी. इतका होता. प्रियंका कारंडेला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. कर्नाटकाची ज्योत्स्ना नार्झे रजतपदकाची मानकरी ठरली.
कुमार गटातील मिश्र रिलेच्या 18.4 कि.मी. अंतराच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संघालाही ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले. कर्नाटकाच्याने सुवर्णपदक मिळविताना 1 तास 07 मिनिट 45.873 सेकंद अशी वेळ दिली. महाराष्ट्राने 1 तास 20 मिनिट 10.204 सेकंद अशी वेळ नोंदविली. महाराष्ट्राच्या संघात जतिन जोशी, संग्राम गुळवे, निशाकुमारी यादव आणि मानवी पाटिल यांचा समावेश होता.
महाराष्ट्राला अखेरचे रजतपदक युवा गटात 15 कि.मी. शर्यतीत आदिप वाघने मिळवून दिले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्याने वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याचे हे दुसरे
पदक ठरले.