‘मौनी’ आणि ‘बेपत्ता’ खासदार

देशातील मोजक्‍या नशीबवान राजकारण्यांमध्ये संदिपान थोरात या माजी खासदाराचे नाव घ्यावे लागेल. कोणतेही कर्तृत्व नसलेल्या या इसमाने 1977, 80, 84, 89, 91, 96 आणि 98 अशा सात वेळेस सलग 21 वर्षे पंढरपूर लोकसभा मतदारसंघाची खासदारकी भूषवली. 1977 मध्ये आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकीत पंढरपूर राखीव मतदारसंघातून कॉंग्रेसचे नेतृत्व योग्य उमेदवाराच्या शोधात होते. वकील असलेल्या संदिपान थोरातांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज केला होता. माढा तालुक्‍याचे रहिवाशी असलेल्या संदिपान थोरातांना केवळ ते वकील आहेत या एका कारणामुळे यशवंतराव चव्हाण यांनी उमेदवार म्हणून निवडले. देशभर आणि महाराष्ट्रभर कॉंग्रेस विरोधात वारे वाहत होते तरी पंढरपूर मतदारसंघाला या वाऱ्याचा स्पर्शही झाला नव्हता. त्यामुळे थोरात हे 77 मध्ये सहजगत्या खासदार म्हणून निवडून आले.

1978 मध्ये कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर संदिपान थोरात यांनी तातडीने इंदिरा गांधी यांच्या इंदिरा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. इंदिरा कॉंग्रेस गाठणारे ते महाराष्ट्रातील पहिले खासदार होते. ही पुण्याई त्यांना 1998 सालापर्यंत उपयोगी पडली. आपल्या बाजूने उभा राहिलेला पहिला खासदार याची नोंद इंदिरा गांधींनी घेतली होती. त्यामुळे 1980 मध्ये इंदिरा कॉंग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी मिळाली. 1980 मध्ये थोरातांच्या विरोधात होते रेड्डी कॉंग्रेसचे लक्ष्मण ढोबळे.

यशवंतरावांचा ढोबळेंवर जीव होता. या मतदारसंघात यशवंतरावांना मानणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. तरीही इंदिरा लाटेमुळे थोरात 80 मध्ये निवडून आले. पुढे 1984, 89, 91, 96 आणि 98 केवळ गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे थोरात यांना उमेदवारी मिळत गेली, 1984 पासून थोरात यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात या मतदारसंघातील प्रबळ अशा मोहिते-पाटील गटाने नेहमीच विरोध केला. मात्र, त्यांच्या विरोधाला डावलण्यात आले. थोरात हे निवडून आल्यानंतर मतदारांना पाच वर्षांनीच दर्शन द्यायचे.

मौनी खासदाराबरोबरच बेपत्ता खासदार ही उपाधीही संदिपान थोरातांनी मिळवली होती. मतदारसंघातील कॉंग्रेसचे सर्व आमदार थोरातांना इच्छा नसतानाही पक्षादेश म्हणून मदत करत असत. सामान्य जनतेला किंमत न देणारे थोरात हे स्वपक्षीय आमदारांचीही पत्रास ठेवत नसत. त्याकाळात या मतदारसंघावर विजयसिंह मोहिते-पाटलांचे वर्चस्व होते. या वर्चस्वामुळे थोरात विनासायास निवडून येत. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर थोरातांची मक्‍तेदारी संपुष्टात आली. राष्ट्रवादीने या मतदारसंघातून रामदास आठवलेंना उमेदवारी दिली. थोरातांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द सोनिया गांधी पंढरपुरात आल्या. मात्र आपल्या सासूबाई इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे सोनियांना मतदारांना प्रभावित करता आले नाही. मोहिते-पाटील गटाच्या ताकदीमुळे रामदास आठवले थोरातांना पराभूत करून सहजगत्या निवडून आले. त्यानंतर थोरातांचे पाच वर्षांने होणारे दर्शनही दुर्मिळ झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.