आळेफाटा – आळे (ता. जुन्नर) प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या कर्मचारी वसाहतीमधील एका कर्मचाऱ्याच्या राहत्या घराला कार धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामधून सुदैवाने दोघेजण बचावले. ही घटना शनिवारी (दि. 7) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या कर्मचारी वसाहतीत ज्ञानेश्वर तळपे हे राहत असून, त्यांच्या घराच्या भिंतीला समोरुन भरघाव वेगाने आलेल्या मोटारीने (एमएच 14 जीएच 7060) धडक दिली. या अपघातामुळे त्यांच्या घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले. अपघात घडला त्यावेळी तळपे यांच्या घरात स्वयंपाकाचा गॅस सुरु होता. सुदैवाने त्यास धक्का लागला नाही त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.
हा अपघात इतका भीषण होता की कारने प्रथम झाडाला व त्यानंतर भिंतीला धडक दिली. एअर बॅग्ज उघडल्यामुळे कारमधील डॉ. गणेश सोनवणे व शरद कुऱ्हाडे हे दोघेजण थोडक्यात बचावले या अपघाताबाबत वंदना ज्ञानेश्वर तळपे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिसांनी कार चालक शरद जगन्नाथ कुऱ्हाडे (रा. आळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.