“आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची प्रेरणा”

कोलकाता – देश 75 व्या स्वातंत्रदिनाच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे, मात्र त्यामागे, नेताजींनी देशाला वाहिलेले आयुष्य, त्यांचे कार्य आणि त्यांनी घेतलेले निर्णय हीच मोठी प्रेरणा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त, आज कोलकाता इथल्या व्हिक्‍टोरिया मेमोरियल इथे पराक्रम दिवसाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते.

जग आज आत्मनिर्भर भारताचे जे रुप पाहात आहे, कधी काळी त्याची कल्पना नेताजींनी केली होती असे मोदी म्हणाले. नेताजींनी देशाच्या प्रत्येक प्रांतातल्या, प्रत्येक जात, पंथ आणि धर्मातल्या नागरिकाला देशासाठीचे सैनिक बनवले असे ते म्हणाले. या सगळ्यामुळेच आज देशाच्या सार्वभौमत्वावर कोणी हल्ला केला, तर देश त्याला सडेतोड उत्तर देऊ लागला आहे. असं त्यांनी नमूद केले. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

यानंतर मोदी यांनी व्हिक्‍टोरिया मेमोरिअल इथे नेताजींच्या जीवनपटावर आधारलेल्या कायमस्वरुपी प्रदर्शनाचेही उद्घाटने केले.  दरम्यान आज दुपारी कोलकात्यात पोहोचल्यानंतर मोदी यांनी दक्षिण कोलकात्यातल्या नेताजींचे निवासस्थान राहिलेल्या ‘नेताजी भवन’ ला भेट दिली आणि नेताजींना अभिवादन केले. मोदी यांनी नॅशनल लायब्ररीच्या आवारात आर्टिस्ट कॅम्पचे उद्घाटन, केले, तिथे त्यांनी नेताजींच्या पुतळ्याचेही अनावरण केले. यावेळी पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर हे ही पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.