MothersDay : मातृदिनीचं मातेचा करुण अंत; मुलाला वाचवताना आईचा पाण्यात बुडून मृत्यू

बीड – जगभरात आज मातृदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्वच स्तरातून आईविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडिया मातृदिनाने व्यापून टाकला आहे. मात्र बीड जिल्ह्यात एका मातेचा करुण अंत झाला आहे. आपल्या लेकराला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचा बुडून मृत्यू झाला.

बीडमध्ये नदीवर कपडे धुण्यासाठी आईसोबत आलेल्या पाच वर्षाच्या मुलागा नदीकाठी खेळत असताना नदीपात्रात पडला. त्याला वाचवण्यासाठी आईने नदीपात्रात उडी घेतली. मात्र या घटनेत आईसह मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली. मातृदिनाच्या दिवशी मुलाला वाचवताना आईसह चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पल्लवी गोकुळ ढाकणे( वय 26) समर्थ गोकुळ ढाकणे( वय 5) अशी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकराची नावे आहेत. गोदावरी नदी काठावरील संगम जळगाव येथील पल्लवी ढाकणे या दुपारी कपडे धुण्यासाठी गोदापात्रात गेल्या असता पाच वर्षाचा समर्थही आई सोबत गेला होता. पल्लवी या कपडे धूत असताना समर्थ अचानक पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. मात्र, पाणी जास्त असल्यामुळे दोघेही बुडाले. यावेळी नदीवर कपडे धुणाऱ्या महिलांनी आरडाओरड केली. मात्र, गावातील तरुण येईपर्यंत पल्लवीसह मुलगा समर्थ यांचा बुडून मृत्यू झाला होता.

ऐन मातृदिनीच्या दिवशी माय-लेकराचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.