पुणे – आपली आई आपल्याला जन्म देते त्याचबरोबर आपल्या जीवनातील पहिला गुरु देखील ही आपली आईच असते. आयुष्यभर आपल्या मुलांवर प्रेम करत जीवन जगण्याचे धडेही देत असते. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून विचार केला तर आपण आज जे काही आहोत, त्यामागे आपल्या आईचा मोठा आधार असतो.
आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या आईसाठी लहानच असतो. याच आपल्या जन्मदात्या आईसाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन (मदर्स डे) साजरा केला जातो. आता हा मातृदिन का साजरा केला जातो? त्याचमागचा इतिहास काय आहे? हे आज आपण जाणून घेऊ या…
‘मदर्स डे’ चा इतिहास…
मदर्स डे ची सुरवात अमेरिकेतील अॅना जार्विस नावाच्या महिलेने केली होती. अॅना एक शांतता कार्यकर्ता होत्या. अमेरिकन गृहयुद्धाच्या दोन्ही बाजूंच्या जखमी सैनिकांची काळजी घेतली. अॅना यांनी वेस्ट व्हर्जिनियामध्ये तिच्या आईसाठी एक स्मारक उभारले होते आणि मातृदिनाला मान्यताप्राप्त सुट्टी द्यावी यासाठी प्रचार देखील केला होता. त्यानंतर 1914 मध्ये, मदर्स डे अमेरिकेत राष्ट्रीय सुट्टी म्हणून ओळखला गेला.
तसेच हा सण इतर देशांमध्येही पसरला आणि आज तो संपूर्ण जगभरात साजरा केला जात आहे. दरम्यान, भारतात मदर्स डे हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. काही देशांमध्ये तो वर्षाच्या वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी सर्वच मुले आपल्या लाडक्या आईला शुभेच्छा आणि खास भेट वस्तू देखील देत असतात.