Corona Death | माय-लेकाचा करोनाने मृत्यू; वडील, पत्नी आणि मुलीलाही लागण; ठाकरे कुटुंब करोनामुळे उध्वस्त

पालघर : राज्यात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याबरोबर कोरोनाबळींचाही आकडा वाढत आहे. शहरी भागात पसरलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत.
अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. अश्यातच पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील माय-लेकाचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ऐनशेत गावातील सरिता सदानंद ठाकरे या महिलेला आणि तिच्या पतीला कोरोना संसर्गाची लागण झाली होती. यानंतर पतीला रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये तर पत्नीला भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सरिता यांचा उपचारादरम्यान 10 एप्रिलला दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलगा सागर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी कल्याण येथे दाखल करण्यात आले.

सागरची प्रकृती सुधारत असताना अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. माय-लेकराच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण वाडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे. सागरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

आईचा कोरोनामुळे मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत, पत्नी आणि मुलीलाही लागण आणि अशा अवस्थेत आईच्या बाराव्या विधीला अवघ्या 34 वर्षाच्या सागरचा कोरोनाने मृत्यू, अशी हृदय हेलावून टाकणारी घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत गावात घडल्याने या घटनेने कोरोनाचे गांभीर्य आणि भीती अधिक गडद केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.