धक्कादायक : आईची माया आटली! ४५ हजारांसाठी पोटच्या गोळ्याचा सौदा!

वडिलांनी तक्रार केल्याने प्रकरण चव्हाट्यावर

हैद्राबाद – आईच्या मायेची थोरवी सांगताना असंख्य उदाहरणे देता येतील. मात्र हैद्राबाद येथे घडलेले एक प्रकरण आई अन् तिचं बाळ यांच्यातील प्रेमाच्या अतूट बंधाला काळिमा फासणार ठरलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हैद्राबाद येथील एका महिलेने ४५ हजारांसाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा सौदा केल्याची एक घटना समोर आली आहे. याबाबत महिलेच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

हैद्राबाद पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, विकण्यात आलेल्या बालकाच्या वडिलांनी काल याबाबत आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत घडलेल्या प्रकरणाचा उलगडा केला. सदर बालकाच्या आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला एका इतर महिलेस ४५ हजार इतक्या किरकोळ रकमेसाठी विकल्याचे पोलीस तपासात आढळून आले.

यानंतर पोलिसांनी बालकाच्या आईसह गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या सहा जणांना अटक केली आहे. सदर बालकाला त्याच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आईनेच आपल्या बालकाचा सौदा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सदर गुन्हाच तपास हैदराबादेतील गोषमहल पोलिसांतर्फे करण्यात येत असून बालक खरेदी करणारी महिला अशा प्रकारचे रॅकेट चालवत होती काय? याचा छडा लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.