पुणे- अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा आईनेच मुलाच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात उघडकीस आली आहे. त्यानंतर 12 वर्षीय मुलाने तिला पिशवीत घालून नदीपात्रात फेकून दिले. याप्रकरणी आईला व मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असून तिचा कर्नाटकातील तरुणासोबत विवाह झाला. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे वय 12 वर्षे आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. यानंतर नोकरीच्या शोधात ती येरवड्यात आली. येथे तिची एकासोबत ओळख झाली. त्या संबंधातून त्यांना मुलगी झाली. दरम्यान, बदनामी होईल, मुलीचे वडील कोण अशी विचारणा झाल्यावर काय उत्तरे द्यायची या चिंतेतून 22 ऑक्टोबरला तिने चिमुरडीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीला पिशवीत घालून तिला नदीपात्रात फेकण्यास मुलाला सांगितले.
शेजारच्यांनी तिला मुलीची विचारणा केली असता, तिला कोणीतरी चोरून नेले असे तिने सांगितले. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात मीसिंगची तक्रार नोंदविली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने चिमुकलीचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी तपासात 12 वर्षीय मुलाने मदत केली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शोधून काढला.