हृदयद्रावक..,पिण्याचे पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरून मायलेकीचा मृत्यू

बारामती – शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल ( मंगळवारी ) रात्री बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडली आहे.  पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी यातून सुदैवाने बचावली आहे.

अश्विनी सुरेश लावंड (वय ३६), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या दुर्दैवी घटनेत मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. तर या घटनेत 12 वर्षाची श्रावणी सुरेश लावंड ही बचावली आहे.

अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात गेल्या होत्या. तिघींना तहान लागल्यानंतर शेजारीच असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या शेततळ्यात पाणी काढण्यासाठी बाटली घेवून उतरल्या होत्या.  यावेळी समृद्धी शेततळ्यात बाटलीत पाणी भरताना पाय घसरुन पडली..

मुलीला वाचवण्यासाठी आई -(अश्विनी ) यांनी प्रयत्न केला मात्र त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या.  त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली तिघीही पाण्यात बुडाल्या.

मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. मात्र ग्रामस्थ घटनास्थळी येण्यापुर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

स्थानिक युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.. या सर्व घटनेचा तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.