जम्मू, – जम्मू काश्मीरमधील “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याला अटक करण्यास आज सुरक्षा दलांना यश आले. हिदायतुल्लाह मलिक असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो जैश ए मोहम्मद या संघटनेचीच शाखा असलेल्या लष्कर ए मुस्तफा या संघटनेचा तो स्वयंघोषित कमांडर आहे. जम्मू शहराच्या बाहेरील भागात त्याची कार पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या जवळून पिस्तुल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. मलिक हा शोपियन जिल्ह्यातील “अ’ श्रेणीतील दहशतवादी असून त्याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका खास माहितीवरून कुंजवाणी बायपास पोलिसांनी एका खासगी वाहनाला अडवले. पळ काढण्याच्या प्रयत्नात दहशतवाद्याने पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला पण त्याला पकडण्यात यश आले. त्याची चौकशी केली जात आहे. अधिक तपास झाल्यावर अधिक माहिती मिळेल, असे जम्मूचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्रीधर पाटील यांनी सांगितले.
मलिक बरोबर काश्मीर ते जम्मू दरम्यानच्या प्रवासात बरोबर असलेल्या आणखी एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.