पाषाण येथे सर्वाधिक अवकाळी पाऊस

पुणे – शहर परिसरात यंदा 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत सरासरी 22.4 मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतमलाचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

देशाच्या किनारी भागात सातत्याने तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची चक्रीय स्थिती यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांत पुण्यासहित राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरात शिवाजीनगर येथील वेधशाळेत 1 मार्चपासून 29.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर, पाषाण येथे 34.6 मिलीमीटर पाऊस पडला. पुण्यात सर्वात कमी पाऊस लोहगाव येथे 3.3 मिलिमीटर पडल्याची नोंद घेण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या काही भागात गारपीटही झाली. 

दरम्यान, अवकाळी पावसानंतर आता मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामान कोरडे रहाण्याची शक्‍यता विभागाने वर्तविली. पुण्यातही आकाश निरभ्र रहाणार असल्याने उन्हाचा चटका वाढेल, असेही सांगण्यात आले. शहरात रविवारी रविवारी कमाल तापमान 37.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तसेच झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगाना दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.